रत्नागिरी : राज्यात सत्तारूढ झालेले भाजप सरकार आता कोणाच्या बळावर ‘विश्वास’ जिंकतं, हे जरी भविष्याच्या कप्प्यात बंद असलं तरी शिवसेनेला बाजूला सारून राष्ट्रवादीशी सलगी करण्याची भाजपची नवी खेळी ही रत्नागिरी पालिकेपर्यंत येऊन पोहोचल्याचे पाहायला मिळत आहे. रत्नागिरी उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीत प्रथमच राष्ट्रवादीने व्हीप बजावून भाजपला शहर विकासासाठी साथ देण्याचे ठरवल्याने राज्याची समीकरणेही अशीच असणार की काय? अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे.विधानसभा निवडणुकीचे कारण पुढे करत भाजपने शिवसेनेकडून नगराध्यक्षपद पदरात पाडून घेतले. निवडणूक मतदानाच्या काही दिवस अगोदर राज्यातील युतीचे धागे तुटले आणि विधानसभा निवडणूक भाजपने स्वबळावर लढवण्याचे ठरवले. यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात भाजपची पीछेहाट झाली असली तरी रत्नागिरी पालिकेत भाजपने नशिबाच्या वा खेळीच्या जोरावर असेल यश मिळवले आहे. नगराध्यक्षपद शिवसेनेकडून गोड बोलून काढून घेणाऱ्या भाजपविरोधात आता अविश्वास ठराव मांडणेही शिवसेनेला तेवढे सोपे राहिलेले नाही. कोणत्याही नगराध्यक्षावर सहा महिन्यांशिवाय अविश्वास ठराव मांडता येत नाही. त्यामुळे शिवसेनेची गोची झाली आहे.विधानसभा निवडणुकीपूर्वी खेळलेल्या खेळीमुळे आत्मविश्वास दुणावलेल्या भाजपने उपनगराध्यक्ष निवडणुकीतही शिवसेनेला पदापासून दूर ठेवण्याचे कारस्थान केले खरे; मात्र काही दिवसांपूर्वीच सेनागृही परतलेल्या माजी राज्यमंत्री उदय सामंत यांच्या पालिकेतील समर्थकांनी शिवसेनेची लाज राखली. सामंत यांच्या चार समर्थकांनी राष्ट्रवादीची साथ सोडत वेगळा गट स्थापन केला आणि शिवसेनेला साथ दिली. वेगळा गट स्थापनेची ‘आयडिया’ या चार समर्थकांनी केली नसती, तर रत्नागिरी पालिकेत मंगळवारी भाजपचाच उपनगराध्यक्ष दिसला असता आणि सर्वात मोठा पक्ष असूनही शिवसेनेला दोन्ही पदांपासून लांब राहावे लागले असते. कारण उपनगराध्यक्षपद निवडणुकीत शहर विकासासाठी भाजपला साथ देण्याचा व्हीप राष्ट्रवादीने बजावला होता. हा व्हीप थोडा लवकर बजावला असता तरीही शिवसेनेची गोची झाली असती.या संपूर्ण प्रकरणात भाजपला राष्ट्रवादीने साथ द्यावी आणि तीही शहर विकासाच्या नावाखाली द्यावी, हे एक न उलगडणारे कोडे आहे. भाजप जवळ करो वा न करो. मात्र, राष्ट्रवादी भाजपच्या अगदी निकट जाऊ पाहातेय, हेच चित्र सध्या रत्नागिरीत पाहायला मिळत आहे. भाजप आपल्या जुन्या मित्राला विसरून नव्या पक्षाशी मैत्री करत आहे आणि विशेष म्हणजे राष्ट्रवादीने राज्यस्तरावर भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतरच रत्नागिरीत या घडामोडी घडल्या आहेत. त्यामागे उदय सामंत यांनी राष्ट्रवादीचा त्याग केल्याने शिवसेनेला पाठिंबा नाही, ही राष्ट्रवादीची भूमिका असू शकते. मात्र, त्याहीपेक्षा राज्यस्तरावर भाजप-राष्ट्रवादी संबंधांची किनार जास्त आहे, हेही तेवढेच निश्चित.विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन भाजप प्रवक्ते बाळ माने यांनी यापुढे जिल्ह्यात भाजप शिवसेनेची साथ न घेता स्वबळावर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लढेल, असे म्हटले होते, त्याचीच ही सुरूवात असू शकते. भाजपने पहिल्या खेळीत शिवसेनेला कोंडीत पकडले, तर दुसऱ्या खेळीत शिवसेनेने राष्ट्रवादीतील फुटीर गटाच्या मदतीने भाजपला धडा शिकवला. सामना बरोबरीत सुटलाय. पण, आगामी राजकारणात कोण बाजी मारणार, याची उत्सुकता यापुढच्या प्रत्येक निवडणुकीत असेल. (प्रतिनिधी)
रत्नागिरी नगरपालिकेतही राजकीय ‘घटस्फोटा’ची तयारी सुरु ?
By admin | Updated: November 11, 2014 22:20 IST