महेश सरनाईक - कणकवली --सन १९९0 पासून सलग पाच निवडणुका आणि सन २00५ मधील पोटनिवडणूक अशा सहा निवडणुकांमध्ये नारायण राणे यांनी विक्रमी मतांनी विजय मिळविला होता. मात्र, या निवडणुकीत त्यांच्या विजयाचा वारू रोखण्याचे काम शिवसेनेचे उमेदवार वैभव नाईक यांनी केले. काँग्रेसला राज्यात तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे. त्यामुळे राज्यातील काँग्रेसचे कार्य खूपच खाली गेले आहे. हे सर्व जरी खरे असले तरी मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आणि कोकणच्या सर्व प्रश्नांची जाण असलेल्या एका अभ्यासू नेतृत्वाची हार झाल्यामुळे राणेंचा पराभव सध्या येथील काँग्रेसच्या जीव्हारी लागला आहे.गत निवडणुकीत म्हणजे सन २00९ साली नारायण राणे हे काँग्रेसचे कोकणातील एकमेव आमदार होते. मात्र, राज्यात काँग्रेस हा पक्ष पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनला होता. या निवडणुकीतही नीतेश राणे हे कोकणातील काँग्रेसचे एकमेव आमदार निवडून आले आहेत. मात्र, यावेळी काँग्रेस पक्ष तिसऱ्या क्रमांकावर आहे. राज्यातील गणिते कोणतीही असोदे राणेंनी काँग्रेस प्रवेश केल्यानंतर म्हणजे सन २00५ पासून या निवडणुकीपर्यंत सिंधुुदुर्ग जिल्ह्यात मात्र, राणे आणि काँग्रेस कायमच प्रथम क्रमांकावर राहिला होता. या निवडणुकीतही मिळालेल्या मतांच्या आकडेवारीत काँग्रेस प्रथम क्रमांकावर असला तरी यावेळी नारायण राणेंचा झालेला पराभव मात्र, काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दु:खदायक आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे माजी खासदार नीलेश राणे यांचा रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात दारूण पराभव झाला होता. यावेळी शिवसेनेचे विनायक राऊत यांनी १, ५१ हजारांचे मताधिक्य मिळविले होते. त्या निवडणुकीतील पराभवानंतर जिल्ह्यातील काँग्रेस अंतर्गत गटतटाचे राजकारणही झाले. त्यातच राणेंचे समर्थक माजी आमदार राजन तेली, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काका कुडाळकर, काँग्रेसचे सावंतवाडी माजी तालुकाध्यक्ष मनोज नाईक यांनी काँग्रेसला पर्यायाने राणेंना सोडचिठ्ठीही दिली होती. त्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेस बॅकफुटवर गेली होती.लोकसभा निवडणुकीनंतर काही महिन्यात राणेंनी काँग्रेसच्या मंत्रीपदाचाही राजीनामा दिला होता. आपण यानंतर निवडणूक लढविणार नाही. असे घोषितही केले होते. राणेंच्या नाराजीनाट्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्येही संभ्रमावस्था जाणवली होती. राणे कोणता निर्णय घेणार याबाबतही उत्सुकता होती. याच कालावधीत वैभव नाईक यांनी चाणाक्षपणे घरोघरी जावून प्रचारात आघाडीही घेतली होती. उमेदवारी अर्ज दाखल होण्याच्या दोन दिवस अगोदर नारायण राणेंनी आपण कुडाळ-मालवणमधून लढणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर प्रचारासाठी केवळ पंधरा दिवसांचा कालावधी होता. त्यामुळे तो कालावधी प्रत्येक लोकांपर्यंत जाण्यास पुरेसा नव्हता. राणे यांनी येथील लोकांना गृहीत धरून आपली रणनिती आखली. मात्र, लोकांनी ती फेल ठरविली. याऊलट राणेंचे सुपूत्र आणि स्वाभीमानी संघटनेच्या बॅनरखाली राजकारणात आलेल्या नीतेश राणे यांनी वैभव नाईक यांच्याप्रमाणेच छुपी राजनिती वापरली. त्यांनी निवडणुकीच्या अगोदर केवळ महिनाभर कणकवली मतदारसंघात ठाण मांडून बसत प्रचारापासून सर्व सूत्रे आपल्या स्वत:च्या हातात घेतली. कार्यकर्त्यांना हाताशी धरले परंतु कोणावरही अतिविश्वास न दाखविता आपल्या स्वाभीमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या फौजेला कामाला लावले. तसेच या दोन महिन्यांच्या कालावधीत त्यांनी जास्त कोणतीही पेपरबाजी न करता मतदार संघातील ९0 टक्के गावांमध्ये स्वत: जावून तेथील लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. लोकांना आपलेसे करत त्यांना आगामी १0 वर्षांच्या कालावधीत आपल्याला तुमचा प्रतिनिधी होण्याची संधी दिली तर आपण कोणत्या पद्धतीने काम करू. याबाबतचा विश्वास लोकांच्या मनात निर्माण करण्याचा प्रयत्न केला. कणकवली मतदारसंघात आमदार प्रमोद जठार यांनी मागील पाच वर्षात कशाप्रकारे संपर्क ठेवला नाही. त्यामुळे मला संधी दिली तर आपण सतत तुमच्या संपर्कात राहूचा नारा देत कणकवली मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा आणि लोकांचा विश्वास संपादन करत मोठ्या मताधिक्याने विजय मिळविला.पक्षीय पातळीवर विचार केल्यास या निवडणुकीत जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघात मिळून काँग्रेसला १ लाख, ६0 हजार २९७ ही पहिल्या क्रमांकाची मते मिळाली आहेत. दुसऱ्या क्रमांकावर शिवसेनेल १, ५४, ३४७ तर तिसऱ्या क्रमांकावर भाजपाला ८३ हजार २६५ मते मिळाली आहेत. म्हणजे मतांच्या गणितामध्ये काँग्रेसच प्रथम क्रमांकावर आहे. मात्र, नारायण राणेंसारख्या ज्येष्ठ नेत्याचा झालेल्या पराभवामुळे सर्वांचे मनोधैर्य खचले आहे. शिवसेनेने तीन पैकी दोन आमदार जिंकून जिल्ह्यात भगवा फडकविला आहे. त्यातच राज्यात काँग्रेस तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनल्याने नीतेश राणे हे विरोधी पक्षातील आमदार होण्याची दाट शक्यता आहे. कारण भाजपा आणि शिवसेनेची सत्ता किवा भाजपा आणि राष्ट्रवादीची सत्ता राज्यात येण्याची शक्यता आहे. नारायण राणे यांनी आपण आगामी आठ दिवसात आपली राजकीय भूमिका स्पष्ट करणार असल्याचे पराभवानंतरच्या पत्रकार परिषदेत जाहीरदेखील केले आहे. त्यामुळे नारायण राणेंचे समर्थक असलेल्या सर्वांच्या नजरा राणेंच्या भूमिकेकडे राहणार आहेत. नारायण राणे हे आक्रमक आणि सहजासहजी हार मानणारे नेतृत्व नसल्याने ते आता राजकीय कारर्किदीमध्ये कोणती भूमिका घेतात यावर जिल्ह्यातील आगामी काँग्रेसच्या राजकारणाची दिशा ठरणार आहे. तोपर्यंत सर्वानाच वाट पाहावी लागणार आहे.नीतेश राणेंची नवीन राजकीय इनिंग सुरूजिल्ह्यात गेल्या २५ वर्षांमध्ये नारायण राणे नावाचे वादळ सतत घोंगावत राहिले. विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्यानंतर हे वादळ जरी शांत झाले असले तरी त्यांचा वारसा लाभलेले त्यांचे सुपूत्र नीतेश राणेंच्या राजकीय खेळीच्या पहिल्या इनिंगला आता खऱ्या अर्थाने सुरूवात झाली आहे. ज्या पद्धतीने त्यांनी गेल्या आठ-नऊ वर्षात स्वाभीमानी संघटनेच्या माध्यमातून वेगवेगवेगळ्या विषयांना हात घालत राजकारणात एंट्री मारली आहे. लोकांनी आगामी पाच वर्षासाठी युवानेतृत्व म्हणून त्यांना संधी दिली आहे. राणेंच्या पराभवामुळे कार्यकर्त्यांप्रमाणे नीतेश राणेही व्यथीत झाले होते. मात्र, आता खऱ्या अर्थाने नीतेश राणेंच्या रूपाने नारायण राणेंसारखाच एक निष्णात राजकारणी म्हणून त्यांच्याकडे येथील जनता पाहत आहे. शिवसेनेचे वैभव नाईक, काँग्रेसचे नीतेश राणे यांच्या नेतृत्वाची कसोटी आता खऱ्या अर्थाने लागली आहे.
राणेंचा पराभव काँग्रेसच्या जिव्हारी
By admin | Updated: October 21, 2014 23:43 IST