लांजा : वेरवलीनजीक १ ते दीड किलोमीटर अंतरावरील जवळजवळ १३० रेल्वे रुळांवरील चाव्या काढण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर मंगळवारी रेल्वे कर्मचाऱ्यांनी आपला तक्रार दाखल केली असून लांजा पोलीसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.वेरवली येथील मनोहर रेडीज यांनी अनेक वर्षांपासून वेरवली येथे रेल्वेस्टेशन व्हावे म्हणून मागणी केली होती. त्यांच्या मागणीचा विचार करुन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या दौऱ्यादरम्यान त्यांनी वेरवलीयेथे संभाव्य जागेची पहाणी करण्यासाठी क्षेत्रीय अभियंता एन. सिद्धाप्पा यांना पाठविले होते. ते पहाणी करण्यासाठी आले असता रेल्वेच्या रुळावरील चाव्या गायब असल्याचे लक्षात आले. त्यांच्यासमवेत क्षेत्रीय रेल्वे प्रबंधक बाबासाहेब निकम, क्षेत्रीय अभियंता एल. प्रकाश, सहाय्यक पी. एन. माळी, अभियंता कापडी हे अधिकारी वेरवली राममंदीर येथील रुळावरुन चालत असताना चॅनेल नं. २४४/४/५ च्या दरम्यान जवळजवळ १ ते दिड किलोमीटर अंतरावरील ९० चाव्या चोरीला गेल्याचे लक्षात आले. एन. सिद्धाप्पा यांनी तात्काळ यंत्रणा बोलावून चाव्या लावून घेतल्या.रेल्वेरुळाच्या चाव्या काढल्यास रेल्वे रुळ वाकडे होऊन अपघात होऊ शकतो. मात्र अधिकाऱ्यांच्या चाणाक्षपणामुळे संभाव्य अपघात टळला आहे. मंगळवारी दुपारनंतर रेल्वे प्रशासनाच्या लाईनमन यांनी लांजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलीस निरीक्षक उत्तम जगदाळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुधीर कुवेस्कर, संजय उकार्डे, बंड्या मसूरकर, चालक संजय जाधव यांनी रेल्वे कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन रेल्वेरुळाची पहाणी केली. यावेळी १३० चाव्या चोरीला गेल्याचे उघड झाले. लांजा पोलीसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)
रेल्वेरुळावरील चाव्या चोरणाऱ्यावर गुन्हा दाखल
By admin | Updated: January 7, 2015 23:54 IST