कुडाळ : कुडाळ ग्रामीण रुग्णालयात मूलभूत सोयीसुविधा येत्या तीन महिन्यांत देऊ, असे आश्वासन आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी कुडाळवासीयांना दिले. यावेळी आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी कुडाळ गामीण रुग्णालयाची पाहणी करून येथील ग्रामस्थांच्या समस्या, प्रश्न जाणून घेतले. त्यांच्यासोबत पालकमंत्री दीपक केसरकर, आरोग्य संचालक सतीश पवार, जिल्हा शल्य चिकित्सक आर. डी. माने, आमदार वैभव नाईक, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अभय शिरसाट, तालुकाप्रमुख राजन नाईक, युवा सेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काका कुडाळकर, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय भोगटे, महिला शिवसेना उपजिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर, बंड्या सावंत, संजय परब, शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांनी कुडाळ हे जिल्ह्याचे मध्यवर्ती शहर असून महामार्ग व रेल्वेस्थानक या ठिकाणी आहे. अपघातांचे तसेच येथील येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त असते. मात्र, या ठिकाणी योग्य प्रमाणात सेवा-सुविधा मिळत नाहीत. वैद्यकीय अधिकारी पदे रिक्त असल्याने गंभीर रुग्णांना जिल्हा रुग्णालय किंवा पणजी-गोवा येथे पाठविण्यात येते. प्रवासादरम्यान रुग्ण दगावण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे येथे योग्य सेवा-सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी केली. माजी जिल्हा परिषद सदस्य संजय भोगटे म्हणाले की, या रुग्णालयातील सोयी-सुविधा जनतेला चांगल्या प्रमाणात देण्यात याव्यात याकरिता वेळोवेळी निवेदने दिली. परंतु प्रशासनाने दुर्लक्षच केले, असे सांगितले. यावेळी आरोग्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, जिल्ह्यातील, विशेष करून कुडाळ ग्रामीण रुग्णालयाच्या समस्या येथील आमदार वैभव नाईक यांनी आमच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत. या समस्या निवारण्यासंदर्भात कारवाई सुरू झाली असून येथील मूलभूत सोयीसुविधा येत्या तीन महिन्यांत सुरळीत केल्या जातील, असे आश्वासन त्यांनी दिले. (प्रतिनिधी)आमदारांनी लक्ष वेधलेरुग्णालयाच्या नवीन इमारती बांधून ठेकेदारांना पैसे देण्यापेक्षा याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरावीत, तसेच वीज, पाणी, येथील रस्ता आणि इतर सुविधा द्याव्यात, अशी मागणी प्रसाद शिरसाट यांनी केली.याठिकाणी असलेल्या इमारतीमध्ये सध्या ३० खाटाच असल्याने अनेक रुग्णांना दुसरीकडे जावे लागत आहे. मात्र, याठिकाणी अजून ६० खाटा बसू शकतात. त्यामुळे आणखी चांगली सेवा देता येईल, याकडे आमदार वैभव नाईक यांनी लक्ष वेधले.
ग्रामीण रुग्णालयांना सोयी देऊ
By admin | Updated: January 5, 2015 00:33 IST