दोडामार्ग : हडी ग्रामपंचायतीने गावाच्या विकासात राजकारण न आणता नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात अग्रेसर राहिली आहे. विकासासाठी पक्षाचा झेंडा बाजूला ठेऊन सर्वांनी एकत्र आल्यानेच विकासाला नवे बळ प्राप्त झाले. गावच्या विकासासाठी भाजपाच्या माध्यमातून हडी ग्रामपंचायतीस नेहमीच सहकार्य केले जाईल. राज्याच्या ‘स्मार्ट व्हिलेज’ संकल्पनेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातून हडी गावास प्रथम प्राधान्य देण्यात येईल, अशी ग्वाही भाजपा जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी दिली. तालुक्यातील हडी ग्रामपंचायतीच्यावतीने अमृत महोत्सवानिमित्त ई-वाचनालयाचा उद्घाटन सोहळा शुक्रवारी काळसेकर यांच्या हस्ते पार पडला. यावेळी तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर, सरपंच महेश मांजरेकर, उपसरपंच संतोष अमरे, माजी सरपंच विलास हडकर, अमृत महोत्सव समिती अध्यक्ष नारायण हडकर, चंद्रकांत पाटकर, संदीप वराडकर, मनोहर पाटकर, दिनेश सुर्वे, प्रकाश तोंडवळकर, महादेव सुर्वे, चंदना लाड, ममता गावकर, योगिता नारिंग्रेकर, चित्रा धुरी, सुहासिनी वाळवे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.काळसेकर यांनी माजी सरपंच विलास हडकर यांनी गावासाठी राबविलेल्या योजना व योगदानाचे कौतुक केले. सरपंच महेश मांजरेकर हेही नव्या नव्या योजना राबवून त्या घरोघरी पोहचवण्यात करीत असलेली धडपड कौतुकास्पद आहे. बाबा मोंडकर यांनी हडी गाव हा तालुक्यात भविष्याच्या व्हिजन ठरवून विकास करण्यात नेहमीच अग्रेसर राहिला असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)वर्षभर विविध उपक्रम : महेश मांजरेकरसरपंच महेश मांजरेकर यांनी अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रत्येक महिन्याला कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे सांगितले. सोलर होम लाईट, गांडूळ युनिट, बायोगॅस, विजेपासून घराचे संरक्षण, रेन वॉटर हार्वेस्टिंग, शोष खड्डे यात नवे उद्दिष्ट गाठले जाईल. तर सामूहिक शेती ही संकल्पना गावात राबवताना ग्रामपंचायत स्तरावर आर्थिक मदतही दिली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. ई-वाचनालय या योजनेतून संगणक व प्रोजेक्टरच्या माध्यमातून थेट पुस्तके वाचण्यास मिळणार आहेत. स्पर्धा परीक्षेचे फॉर्म भरणे ही सुविधा उपलब्ध युवकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
हडी गावाला ‘स्मार्ट व्हिलेज’साठी प्राधान्य
By admin | Updated: September 26, 2015 00:14 IST