सावंतवाडी : सावंतवाडी पर्यटन महोत्सव २०१४ निमित्त आयोजित केलेल्या शाहीर आझाद नायकवाडीयांच्या शाहिरी पोवाड्यांनी सावंतवाडीकर रसिक मंत्रमुग्ध झाले.शाहीर आझाद नायकवाडी यांच्या ३५ कलाकारांसह डफाच्या बोलावर शाहिरी कार्यक्रम करण्यात आला. यावेळी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पर्यटक व नागरिकांची गर्दी जमली होती. सावंतवाडी पर्यटन महोत्सवातील भव्य व्यासपीठावर या पस्तीस कलाकारांनी व्यासपीठ फुलून गेले होते. डफाच्या बोलावर शाहिरी कार्यक्रमात शाहिरांच्या पोवाड्यातून सावंतवाडीची विविध बाबतीतील महती तसेच शिवरायांचे चरित्र स्मरणात राहिल, अशा रितीने सादर करण्यात आले. महोत्सवाचे उद्घाटन युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाल्यानंतर या कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे, राज्यमंत्री दीपक केसरकर व आमदार वैभव नाईक यांनीही उपस्थिती दर्शवत या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. राज्यमंत्री केसरकर यांचे व्यक्तिमत्त्व पोवाड्यातून कलाकारांनी सादर केले. त्यांनी सामाजिक, राजकीय कारकिर्दीत घेतलेली झेप कलाकारांनी डफाच्या बोलवर शाहिरी पोवाड्यातून सादर केली. शाहिरी पोवाडे, लोकगीते, स्फूर्तीगीते व भक्तीगीतांचा बहारदार वर्षाव एकामागेएक ३५ कलाकारांनी सादर केला. पर्यटन व स्थानिक नागरिक यांच्या प्रचंड प्रतिसादाने या शाहिरांनी वाहवा मिळविली. रात्री उशिरापर्यंत हा कार्यक्रम सुरू होता.जिल्ह्यात प्रथमच कोल्हापूर येथील सुप्रसिद्ध शाहीर आझाद नायकवाडी यांचा डफाच्या बोलावर कार्यक्रम झाल्याने जिल्ह्यातील तसेच गोवा राज्यातील शाहीरी पोवाडे रसिकांनी उपस्थिती दर्शवली होती. सावंतवाडीतील साहित्यिक दिवंगत दिग्गज व्यक्तींची नावे घेऊन कलाकारांनी शाहिरी पोवाडे सादर केले. (वार्ताहर)
पोवाड्यांनी सावंतवाडीवासीय मंत्रमुग्ध
By admin | Updated: December 26, 2014 00:21 IST