अनंत जाधव ल्ल सावंतवाडी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस दल निवडणूक पार्श्वभूमीवर अद्ययावत झाले आहे. पाच मुख्य पोलीस दूरक्षेत्रांवर सीसीटिव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. यामुळे अवैध धंद्याबरोबरच मोठ्या गुन्ह्यांतील आरोपींना पकडण्यात पोलिसांना सोयीचे होणार आहे. या सीसीटिव्ही कॅमेरांचा प्रस्ताव यापूर्वीच पाठवण्यात आला होता. त्यावर निवडणूक काळात तातडीने अंमलबजावणी करण्यात आली आहे. सिंधुदुर्गच्या सीमेवर गोवा, कर्नाटक व कोल्हापूर अशा दोन राज्यांचा तसेच एका जिल्ह्याचा काही भाग येत असल्याने सिंधुदुर्गात कोणतीही घटना घडली की, आरोपी शेजारच्या राज्यांचा आसरा घेत असतात. मग त्या आरोपींना पकडण्यात पोलिसांना अपयश येत असे कधीकधी कोणता आरोपी कुठल्या दिशेला गेला त्याने कोणते वाहन वापरले, याची माहिती पोलिसांनी मिळत नाही आणि तपास थंडावतो. त्यामुळेच तत्कालीन पोलीस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे यांच्या काळात जिल्ह्यातील सर्व पोलीस दूरक्षेत्रे ही सीसीटिव्ही कॅमेऱ्याने जोडण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. हा प्रस्ताव गृहविभागाकडे देण्यात आला. मात्र, त्यावर गेले वर्षभर कार्यवाही होत नव्हती. अनेक वेळा त्याचा पाठपुरावाही करण्यात आला होता. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्याची संवेदनशीलता पाहता यावेळी तातडीने सीसीटिव्ही बसविण्याबाबत गृहविभागाने मंजुरी दिली. त्यानुसार इन्सुली, खारेपाटण, आंबोली, करूळ व फोंडा या पाच महत्त्वाच्या पोलीस दूरक्षेत्रावर सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. साधारणत: १ लाख रूपये एका सीसीटिव्हीला खर्च आला असून अन्य दूरक्षेत्रावरही लवकरच सीसीटिव्ही बसवण्याबाबत पोलीस दलात विचारविनिमय सुरू करण्यात आला आहे. या सीसीटिव्हीची उपकरणेही त्या दूरक्षेत्रातच राहणार असून, लवकरच ते सीसीटिव्ही पोलीस अधीक्षक कार्यालयास जोडण्याबाबत विचारविनिमय गृहविभागाच्या स्तरावर सुरू आहे. या सीसीटिव्हीमुळे गुन्हेगारीवर नियंत्रण येणार असून अवैध दारू वाहतूक रोखण्यात येईल. तसेच बऱ्याच पोलीस दूरक्षेत्रावर पैशांचा व्यवहार होत असल्याने त्यालाही निर्र्बध येईल. कारण बाहेरून येणाऱ्या गाड्यांना थांबवून मोठ्या प्रमाणात पैसे उकळण्याच्या प्रकारावरून वादंग झाला होता. आता सीसीटिव्ही बसविण्यात आल्याने या प्रकाराला आळा बसेल, असे मत व्यक्त होत आहे. ४ सिंधुदुर्ग जिल्ह्यात निवडणूक काळात पोलिसांनी तसेच महसूल विभागाने विशेष काळजी घेत १७ पोलीस नाक्यांवर स्पीड सर्वेक्षण पथक उभारले आहे. त्यांच्याकडेही निवडणूक काळापुरते व्हिडिओ कॅमेरे देण्यात आले असून तेही प्रत्येक गाड्यांचे चित्रण करत आहेत.
पोलीस दल झाले अद्ययावत
By admin | Updated: October 4, 2014 23:32 IST