कणकवली : मंगळवारी येथील उपजिल्हा रूग्णालयात बाह्यरूग्ण विभागात विविध प्रकारचे सुमारे ३०० रूग्ण आले होते. मात्र, केवळ दोन डॉक्टर रूग्णालयात उपस्थित होते. त्यामुळे रूग्णांना ताटकळात रहावे लागले. रूग्णालयात १४ मंजूर पदांपैकी फक्त ४ डॉक्टर्स सध्या सेवेत आहेत. अकरा दिवसांचे गणपती विसर्जित झाले असून मंगळवार हा आठवडा बाजाराचा दिवस असल्याने येथील उपजिल्हा रूग्णालयाच्या बाह्यरूग्ण विभागात रूग्णांची गर्दी झाली होती यामध्ये गणेशोत्सवानिमित्त गावी आलेल्या मुंबईकरांचाही समावेश होता. मात्र, या रूग्णांना तपासण्यासाठी फक्त दोन डॉक्टर्स मंगळवारी उपस्थित होते. दोन डॉक्टर्स रजेवर असल्याने हजर असलेल्या दोन डॉक्टरांवर ताण आला होता. रूग्णालयासाठी १४ वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे मंजूर आहेत. त्यापैकी ४ डॉक्टर्स सेवेत आहेत. उर्वरित पदे रिक्त आहेत. यामुळे बऱ्याचदा रूग्णांना उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात येते. त्यामुळे रूग्णांना आर्थिक भुर्दंड आणि मनस्ताप सहन करावा लागतो. डॉक्टर्स सिंधुदुर्गात येण्यास तयार नाहीत. उपजिल्हा रूग्णालयात रिक्त असलेल्या पदांची भरती करण्याची आश्वासने आतापर्यंत देण्यात आली. मात्र, अद्याप यावर ठोस उपाय न झाल्याने रूग्णांना याचा फटका बसत आहे. यावर उपाययोजनांची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)
उपजिल्हा रूग्णालयात रूग्ण ताटकळल
By admin | Updated: September 11, 2014 00:02 IST