ओटवणे : कर्तबगारी, प्रामाणिक आणि एकनिष्ठपणे एखादे कार्य केल्यानंतर त्यात यश हे नक्कीच मिळते. पण यश मिळाल्यानंतर गाफिल न राहता त्यात जागृतेने कार्यक्षम राहण्याचे प्रतिपादन पोलीस दलातील राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त विलवडे गावचे सुपुत्र व ठाणे जिल्ह्याचे पोलीस उपनिरीक्षक परशुराम रामा राणे यांनी विलवडे येथे केले. विलवडे गावाच्यावतीने नुकत्याच केलेल्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. विलवडे ग्रामस्थांनी विलवडे गावचे सुपुत्र आणि विविध क्षेत्रात उच्च पदावर पोहोचलेल्या तीन व्यक्तींच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विलवडे येथून जीवनाचा श्रीगणेशा करणारे परशुराम रामा राणे यांनी ३७ वर्षांच्या कार्यकालात एकूण ३६८ पदके पटकावली. तर राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रपती पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. अत्यंत कर्तव्यदक्ष अशा परशुराम राणेंनी मुंबईच्या २६ नोव्हेंबरच्या हल्यातही मृत्यूला सामोरे जात सशक्त कामगिरी बजावली होती. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना वेळोवेळी गौरविण्यात आले होते. त्यांचा या कार्यक्रमात मृत्यूपश्चात गौरव करण्यात आला. तसेच विलवडे गावचे सुपुत्र असलेले तुकाराम सखाराम सावंत यांची गोवा येथे उपजिल्हाधिकारीपदी निवड झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील हा युवक आपल्या नेतृत्वकौशल्य गुणांनी उपजिल्हाधिकारी पदापर्यंत झेप घेतो, याचे मूर्तिमंत उदाहरण असलेल्या सावंत यांच्यासह विलवडेचे मुंबईस्थित रहिवासी सुभाष यशवंत दळवी यांच्या सामाजिक योगदानाबाबत त्यांचा सत्कार करण्यात आला. विलवडे येथील श्री माऊली मंदिरामध्ये घेतलेल्या या सत्कार कार्यक्रमास वराडकर सर, गर्दे सर या वरिष्ठ शिक्षकवृंदासह बांदा येथील अन्वर खान, देवस्थानचे बाळकृष्ण दळवी, उद्योगपती आबा दळवी, अशोक देसाई, नाना गावडे, राजाराम दळवी, सभापती गंगाराम गावडे, कृष्णा सावंत, सोनू दळवी, अभिलाष देसाई, प्रकाश दळवी, मोहन दळवी, संतोष दळवी, नंदकिशोर दळवी, रमेश परब, सुरेश सावंत व विलवडे ग्रामस्थ उपस्थित होते. विनायक दळवी यांनी मनोगत व्यक्त केले. कृष्णा सावंत यांनी आभार मानले. यावेळी सुभाष दळवी यांनी विलवडे माऊली देवीच्या जीर्णोध्दारासाठी ५५ हजार ५५५ रुपयांची देणगी देवस्थान मंडळाकडे सुपूर्द केली. (प्रतिनिधी)
यश मिळाल्यानंतरही कार्यक्षम रहावे परशुराम राणे
By admin | Updated: November 16, 2014 23:48 IST