सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात यावर्षी लेप्टोस्पायरोसीस या साथीवर आतापर्यंत नियंत्रण मिळविण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले असले तरी जिल्ह्यात डेंग्यूचे रूग्ण आढळू लागल्याने हिवताप विभागाच्या डास निर्मूलन अभियानाच्या मर्यादा उघड होऊ लागल्या आहेत.सिंधुदुर्ग जिल्ह्यात दरवर्षी लेप्टो, डेंग्यूसारख्या साथरोगांचा फैलाव होऊन आरोग्य यंत्रणेची तारांबळ उडते. मात्र, यावर्षी या साथरोगाचे निदान होऊन त्यादृष्टीने अगोदरपासूनच जिल्हा आरोग्य यंत्रणेने योग्य नियोजन, प्रचार, प्रसिद्धी आणि आवश्यक औषध साठा उपलब्ध करून ठेवल्याने लेप्टोसदृश तापसरीवर आरोग्य यंत्रणेला नियंत्रण मिळविण्यात यश आले. यावर्षी भातलावणी कालावधीत लेप्टोसदृश तापसरीचा फैलाव जाणवला नाही. गणेशोत्सव कालावधीत चाकरमान्यांवर लक्ष केंद्रीत करून ठिकठिकाणी बसस्थानके, रेल्वे स्थानके अशा ठिकाणी आरोग्य पथके तैनात करून खबरदारी घेण्यात आल्याने या साथीवर चांगलेच नियंत्रण मिळाले.मात्र, हिवताप विभागाकडून डास निर्मूलन मोहीम राबविताना योग्य नियोजनाचा अभाव जाणवला. मोठ्या वस्त्या आणि रहदारीची ठिकाणे या ठिकाणीच औषध फवारणीसारखे उपक्रम राबविण्यात आले. ठिकठिकाणी असलेली उघडी गटारे, उघड्या टाक्या आणि अर्धवट स्थितीत असलेली शौचालयाची कामे यामुळे यावर्षी पावसाळ््यात डासांचे प्रमाण कमालीचे वाढले होते. अर्धवट स्थितीत असलेली बांधकामे, स्लॅबच्या इमारतीवर साचणारे पावसाचे पाणी यामध्ये डासांची उत्पत्ती होऊ शकते. मात्र, हिवताप विभागाकडून मोठ्या वस्त्या आणि कर्मचारी वसाहती परिसरातच औषध फवारण्याचे कार्यक्रम हाती घेण्यात आले. अन्य ठिकाणी दुर्लक्षच झाले. हिवताप विभागासमोरील शासकीय आवारात याच विभागाचे गप्पी मासे पैदास केंद्राचा हौद आहे. यामध्ये पावसाचे पाणी साठून मोठ्या प्रमाणात डास उत्पत्ती होऊ शकते, अशा जिल्ह्यात अनेक ठिकाणी गप्पी माशांच्या पैदासीसाठी बांधण्यात आलेले शेकडो हौद डास उत्पत्तीला कारणीभूत ठरत आहेत. या हौदामध्ये गप्पी मासे नसून बेडूक आहेत. याचा कचरा टाकण्यासाठी वापर होताना दिसत आहे.गेल्या दोन दिवसांपूर्वीच फोंडा येथे डेंग्यूचा एक रूग्ण आढळून आला आहे तर आतापर्यंत सुमारे १३ रूग्ण डेंग्यूचे आढळले आहेत. डेंग्यूने एकाचाही मृत्यू झाला नसला तरी रूग्णांच्या संख्येत हळूहळू वाढ होताना दिसत आहे. आता तर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याबाहेरून निवडणूक प्रचारासाठी काही तरूण येण्याची दाट शक्यता आहे. त्यांच्याकडून डेंग्यूची साथ फैलावण्याची दाट शक्यता आहे. त्याचप्रमाणे इतरही साथरोग पसरण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी हिवताप विभाग आणि आरोग्य विभागाचे नियोजन काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर आता भातकापणी हंगाम सुरू होणार आहे. त्यादृष्टीनेही आतापासूनच उपाययोजना आखण्याची आवश्यकता आहे. (प्रतिनिधी)
डास निर्मूलनाच्या मर्यादा उघड
By admin | Updated: September 24, 2014 00:01 IST