सावंतवाडी : जयशंभो कला- क्रीडा मंडळ व छत्रपती वाचनालय यांनी आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेमुळे शालेय खेळाडूंच्या क्रीडागुणांना वाव मिळाला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक बळ मिळेल व भविष्यात ते स्वकर्तृत्वावर स्वत:ची ओळख निर्माण करतील, असा विश्वास व्यक्त करीत मंडळाला आगामी काळात राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा घेण्याचे सौभाग्य मिळावे, असे प्रतिपादन सावंतवाडी संस्थानचे राजे खेमसावंत भोसले यांनी केले. माजगाव- म्हालटकरवाडा येथील मैदानावर घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेतील विजेत्या संघांना राजेसाहेब खेमसावंत भोसले यांच्या हस्ते चषक व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष संदीप सावंत उपस्थित होते. जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांना सावंतवाडी संस्थानचे राजे खेमसावंत भोसले यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी सीताराम गावडे, अभिमन्यू लोंढे, शिवराम सावंत, सुरेश सावंत, आदी उपस्थित होते. ४0 संघ, ४८0 खेळाडूंचा सहभागजिल्ह्यातील ४० संघ व ४८० खेळाडूंचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत १६ वर्षांखालील मुलींच्या गटातून सावंतवाडी येथील राणी पार्वतीदेवी हायस्कूलने प्रथम, तर सेंट्रल इंग्लिश स्कूल, सावंतवाडीने द्वितीय क्रमांक मिळविला. १४ वर्षांखालील मुलींच्या गटातही राणी पार्वतीदेवी हायस्कूलचा संघ विजेता, तर दाणोली हायस्कूलचा संघ उपविजेता ठरला. १६ वर्षांखालील मुलांच्या गटात माणगाव हायस्कूल विजेता, तर देवगड संघ उपविजेता ठरला. १४ वर्षांखालील मुलांच्या गटात वेंगुर्ले पाट हायस्कूलने प्रथम, तर दाणोली हायस्कूलने द्वितीय क्रमांक मिळविला. स्पर्धेतील १६ वर्षांखालील विजेत्या ठरलेल्या राणी पार्वतीदेवी हायस्कूल, सावंतवाडी (मुली) व माणगाव हायस्कूल (मुले) यांना मंडळाकडून प्रत्येकी २ हजार ५०० रुपये व मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले, तर उपविजेत्या सेंट्रल इंग्लिश स्कूल, सावंतवाडी (मुली) व देवगड हायस्कूल (मुले) यांना प्रत्येकी २ हजार, मानचिन्ह देण्यात आले. १४ वर्षांखालील विजेत्या राणी पार्वतीदेवी संघास (मुली) व पाट हायस्कूल संघास (मुले) प्रत्येकी २ हजार व चषक, तर उपविजेत्या दाणोली हायस्कूल (मुली) व दाणोली हायस्कूल (मुले) यांना प्रत्येकी १ हजार ५०० रुपये व चषक देऊन गौरविण्यात आले. १४ वर्षांखालील मुलांच्या गटात तेजस मराळ उत्कृष्ट चढाईपटू, यशवंत जाधव उत्कृष्ट पकड, रमाकांत कामतेकर याला अष्टपैलू खेळाडू म्हणून गौरविण्यात आले, तर मुलींच्या गटात दीक्षा सावंत चढाईपटू, प्रांजल पवार उत्कृष्ट पकडपटू, वृषाली सावंत अष्टपैलू खेळाडू म्हणून सन्मानित करण्यात आले. १६ वर्षांखालील मुलांच्या गटातून तेजस परब उत्कृष्ट चढाईपटू, आनंद नाणचे उत्कृष्ट पकडपटू, आदेश हळवणकर अष्टपैलू खेळाडू ठरला, तर मुलींच्या गटात निकिता राऊळ उत्कृष्ट चढाईपटू, अलिस्का आल्मेडा उत्कृष्ट पकडपटू व मनीषा पुजारे अष्टपैलू खेळाडू ठरला. या बाराही खेळाडूंना मंडळाच्यावतीने गौरविण्यात आले. जयशंभो कला-क्रीडा मंडळ व छत्रपती वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेस सिंधुुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशनचे कार्यवाह संजय पेडणेकर, शैलेश नाईक, अनिता सडवेलकर यांनी विशेष मेहनत घेतली. कबड्डी फेडरेशनचे पंच विशाल पारकर, रोहन पाटील, शैलेंद्र सावंत, संदीप वेंगुर्लेकर, वसीम शेख, मोहसीन शेख, निखिल सावंत, प्रसाद दळवी, जितेंद्र म्हापसेकर, विश्राम नाईक, संतोष कोरगावकर, गौरव शिर्के, राजन पाताडे, राजन अंजनकर, राजन मयेकर, कृष्णा सावंत आदींनी सहकार्य केले. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी जयशंभो मंडळ व छत्रपती वाचनालयाच्या सदस्यांनी मेहनत घेतली. (वार्ताहर)
आता राज्यस्तरीय स्पर्धा घ्याव्यात
By admin | Updated: January 7, 2015 23:57 IST