वैभववाडी : काँग्रेस सोडून अन्य पक्षात जाणाऱ्यांनी त्यांच्याकडून संरक्षणाची हमी आधीच घ्या. आमच्या पक्षात ‘इनकमिंग फ्री’ असते. मात्र ‘आऊटगोर्इंग’ आमच्या पद्धतीनेच होईल. आम्ही गांधीजींच्या पक्षात असलो तरी छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत हे जाणाऱ्यांनी ध्यानात ठेवावे, असा सज्जड इशारा आमदार नीतेश राणे यांनी कुंपणावरील काँग्रेस पदाधिकाऱ्यांना दिला.विधानसभा निवडणुकीत चांगले मताधिक्यक दिलेल्या निवडक बुथ कमिटी अध्यक्षांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी तालुकाध्यक्ष दिगंबर पाटील, महिला बालविकास सभापती स्नेहलता चोरगे, सभापती वैशाली रावराणे, नासीर काझी, जयेंद्र रावराणे, अरविंद रावराणे, जिल्हा परिषद सदस्य दिलीप रावराणे, धोंडीराम पवार, मंगेश गुरव, अंबाजी हुंबे, शुभांगी पवार, प्रफुल्ल रावराणे आदी उपस्थित होते.आमदार राणे म्हणाले, राजकारणात चढउतार प्रत्येकाच्या वाट्याला येत असतात. काँग्रेस नेते नारायण राणे यांनी गेल्या २५ वर्षांत ज्यांच्याकडे कपडे नव्हते अशांना मोठे केले आहे. मात्र जिल्ह्याची राजकीय स्थिती बदलल्याने निर्माण झालेल्या वादळात आमच्यासोबत कोण थांबतात आणि कोण कुठे जातोय हे आम्ही पाहणार आहोत. सैन्याप्रमाणे पक्षातही शिस्त महत्वाची असते. त्यामुळे बेशिस्त वागून पक्षाची बदनामी आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण करणाऱ्यांची अजिबात गय करणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. (प्रतिनिधी)पुन्हा एकाचे तीन करणारच!या मतदारसंघात काँग्रेस पक्षासाठी चांगले वातावरण तयार झाले आहे. ते तसेच टिकवून पुढील सर्व निवडणुकांना सामोरे जायचे आहे. त्यामुळे यापुढे मोजक्याच लोकांचा विकास न होता प्रत्येक प्रामाणिक कार्यकर्त्यांना बळ दिले जाईल. पूर्वी राणेंच्या विचाराचे तीन आमदार होते. आता एकच आहे. तुमच्या पाठबळावर पुन्हा एकाचे तीन आमदार करून दाखविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे सांगितले.
पक्ष सोडून जाणाऱ्यांना नीतेश राणेंकडून सज्जड दम
By admin | Updated: January 6, 2015 01:20 IST