रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गाजावाजा करत एका नेत्याच्या पावलावर पाऊल टाकत राष्ट्रवादीतील जे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या विश्वासाने शिवसेनेत गेले होते, त्यांचा आता भ्रमनिरास झाला आहे. त्यांचे अस्तित्वच धोक्यात आल्याने हे नेते व कार्यकर्तेही आता परतीच्या मार्गावर आहेत. पडद्यामागे बऱ्याच राजकीय घडामोडी सुरू आहेत. येत्या महिनाभरात कार्यकर्त्यांच्या परतीवर शिक्कामोर्तब होणार असून, रत्नागिरी मतदारसंघात राष्ट्रवादी कॉँग्रेसला पुन्हा ‘पॉवर’ मिळण्याचे स्पष्ट संकेत आहेत. राज्यात शिवसेना व भाजपा यांची युती तुटल्यानंतर राजकीय सोय व सावधानता म्हणून एका राजकीय नेत्याने निवडणुकीच्या तोंडावर अचानकपणे राष्ट्रवादीतून शिवसेनेत उडी मारली. त्यावेळी आपल्यासोबत राष्ट्रवादीतील कार्यकर्ते व नेत्यांची एक फळीही नेली. त्यामुळे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीची पॉवर काही प्रमाणात कमी झाली होती. मात्र, हा गड राखण्यासाठी, मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी त्यावेळी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मच्छिमार नेते बशीर मुर्तुझा यांना उमेदवारी दिली होती. त्यांना मतदारसंघात चांगली मते मिळाली होती. त्यामुळे या मतदारसंघात राष्ट्रवादी कॉँग्रेसची ताकद बऱ्यापैकी असल्याचे पक्षनेतृत्त्वाच्याही लक्षात आले होते. मात्र, शिवसेनेत गेल्याने जुने शिवसैनिक व नवीन आलेले शिवसैनिक असा वाद शिवसेनेत निर्माण झाला. सेनेच्या जुन्या व निष्ठावान शिलेदारांनी सुरुवातीला थोडी नरमाईची भूमिका घेतली. मात्र, नंतर जुन्या शिवसैनिकांनी आपली ताकद दाखवून दिल्यानंतर व राज्यस्तरावरूनही नव्याने दाखल झालेल्यांची फारशी दखल घेतली जात नाही, हे लक्षात आल्यावर आपण चुकीच्या ठिकाणी आलो. जुन्या सैनिकांपुढे आपला निभाव लागणार नाही, हे लक्षात आल्याने राष्ट्रवादीतून बाहेर पडलेले हे नेते व कार्यकर्ते आता राष्ट्रवादी कॉँग्रेसमधील नेत्यांच्या संपर्कात आहेत. आपला निर्णय चुकल्याची कबुली देत हे नेते व कार्यकर्ते राष्ट्रवादीत परतण्याच्या मार्गावर आहेत. तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीतही नवीन शिवसैनिकांची चांगलीच कोंडी झाली. त्यामुळे आपली राष्ट्रवादी बरी, अशी प्रतिक्रीयाही परतीच्या मार्गावर असलेल्या कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)चव्हाणना मिळणार मंत्रीपद ?दरम्यान, जिल्ह्यात शिवसेनेच्या कोणत्या आमदाराला येत्या काहीकाळात मंत्रीपद मिळणार, याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चेचे गुऱ्हाळ घातले जात आहे. मात्र, सध्या राज्याचे पर्यावरणमंत्री असलेले रामदास कदम यांच्या विधानपरिषद सदस्यत्त्वाची मुुदत संपल्यानंतर चिपळूणचे आमदार सदानंद चव्हाण यांना मंत्रीपद मिळण्याची दाट शक्यता आहे. आपल्या नेत्यालाच कोणी विचारत नाहीत तर आपल्याला पक्षात कोण विचारणार, असा सूर राष्ट्रवादीतून सेनेत गेलेल्या नेते व कार्यकर्त्यांमध्ये आहे.शिवसेना आणि भाजपमध्ये अंतर्गत सुंदोपसुंदी होत असताना दुसरीकडे राष्ट्रवादीकडे आता जुन्या कार्यकर्त्यांचा ओघ वाढल्याने पुन्हा या मतदारसंघात राष्ट्रवादी जोर करू शकते. शिवसेना - भाजपच्या तुटलेल्या मनाचा फायदा राष्ट्रवादीला मिळू शकतो. त्यामुळे पुढील गणितं पाहण्यासारखी होणार आहेत.शिवसेनेत गेलेले राष्ट्रवादीचे जुनेजाणते नेते व कार्यकर्ते राष्ट्रवादीत परतण्याच्या तयारीत आहेत. हे होणारच होते. अनेक कार्यकर्ते व नेतेही राष्ट्रवादीत परतण्याबाबत आपल्याशी सतत संपर्कात आहेत. त्यामुळे विरोधी गोटात अस्वस्थता असणे साहजिक आहे. पण, हे होणार आहे. सन्मानाने आम्ही त्या कार्यकर्त्यांना व नेत्यांना स्वगृही घेणार आहोत. ‘सुबह का भुला, शामको वापस आये तो उसे भुला नहीं कहते’ याच न्यायाने या कार्यकर्त्यांना पक्षात स्थान दिले जाईल.-बशीर मुर्तुझा, राष्ट्रवादी कॉँग्रेस अल्पसंख्याक सेलचे सरचिटणीस.
राष्ट्रवादीला पुन्हा मिळणार पॉवर
By admin | Updated: April 23, 2015 00:34 IST