सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांत आज, बुधवारपर्यंत ५० उमेदवारी अर्जांची विक्री झाली, तर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून साटेली भेडशी येथील किशोर अनंत लोंढे यांनी सावंतवाडी प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल इनामदार यांच्याकडून अर्ज घेतला.सावंतवाडीत मंगळवारपर्यंत अकरा, कुडाळमधून दहा अर्ज विक्रीस गेले होते. आज कुडाळमधून एकही अर्ज विक्रीस गेला नाही. कणकवली मतदारसंघात आजपर्यंत २८ जणांनी उमेदवारी अर्ज घेतले आहेत. यात चंद्रकांत जाधव (बसप), सुनील सरवणकर (अपक्ष), राजन दाभोलकर (मनसे), विठ्ठल कासले (भारत मुक्ती मोर्चा), संजय पाताडे (भाजप), अतुल रावराणे (राष्ट्रवादी) या सहाजणांचा समावेश आहे. राष्ट्रवादीतर्फे तीन उमेदवार व राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघांतील उमेदवारांची नावे जाहीर केली असून, त्यात कणकवलीसाठी अतुल रावराणे, कुडाळसाठी पुष्पसेन सावंत आणि सावंतवाडीसाठी सुरेश दळवी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. ते शनिवारी अर्ज दाखल करतील. जर स्वतंत्ररीत्या निवडणूक लढवायची झाल्यास राष्ट्रवादीनेही तयारी केली आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वैभव नाईक हे कुडाळ-मालवण मतदारसंघातून, काँग्रेसचे आमदार विजय सावंत हे पक्षाने तिकीट नाकारल्यास अपक्ष म्हणून कणकवली मतदारसंघातून, काँग्रेसतर्फे नीतेश राणे कणकवलीतून आणि उद्योगमंत्री नारायण राणे कुडाळमधून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.माजी आमदार राजन तेली हे सावंतवाडी मतदारसंघातून शुक्रवारी अर्ज भरणार आहेत, तर महायुतीच्यावतीने कणकवली विधानसभा मतदारसंघातून शेवटच्या दिवशी म्हणजे २७ रोजी आमदार प्रमोद जठार उमेदवारी अर्ज दाखल करतील. अनेक उमेदवारांनी शुक्रवारी पसंती दिली आहे. (प्रतिनिधी)
राष्ट्रवादीची स्वतंत्र लढण्यासाठी तयारी; एक अर्ज दाखल
By admin | Updated: September 25, 2014 00:20 IST