सावंतवाडी : शिवतेज मित्रमंडळ, सावंतवाडी आयोजित भव्य नरकासूर स्पर्धा येथील मोती तलावानजीक घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये आकर्षक नरकासूर बनविल्याने उभाबाजार हनुमान मित्रमंडळाने प्रथम क्रमांक पटकावला. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना प्रमाणपत्र, चषक आणि प्रथम क्रमांकाचे ५००१ रुपये मान्यवरांच्या हस्ते देत गौरविण्यात आले. या नरकासूर स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.यावर्षी २४ मंडळांनी या स्पर्धेत सहभाग दर्शविला होता. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या स्पर्धेमुळे मोती तलाव काठ झळाळला होता.सावंतवाडी शहरात दरवर्षीच नरकासूर स्पर्धा भरविल्या जातात. काहीवर्षांपूर्वी एकदोन ठिकाणी होणाऱ्या या स्पर्धा हळुहळु वाढत गेल्या. या स्पर्धांना नागरिकांचा व दर्शकांचा मोठा प्रतिसाद मिळत गेल्याने या स्पर्धांनी मोठे स्वरुप प्राप्त केले आहे. या स्पर्धांमध्ये सहभाग घेणाऱ्या मंडळांची संख्याही आता वाढत जात आहे. प्रत्येकाला आपली कला सादर करण्याची संधी मिळत असल्याने नरकासूर बनविण्याच्या स्पर्धांना स्पर्धक मंडळांचा सहभाग वाढताना दिसत आहे.या स्पर्धेत द्वितीय क्रमांक महापुरुष कला क्रीडा मंडळ, खासकीलवाडा, तृतीय क्रमांक आमची एकजूट मित्रमंडळ, न्यू खासकीलवाडा यांनी मिळविला. उत्तेजनार्थ प्रथम पारितोषिक रघुनाथ मार्केट मित्रमंडळ, द्वितीय महापुरुष कला क्रीडा मंडळ, गोठण, तृतीय वैश्ययवाडा स्टार मंडळ यांनी मिळविले. स्पर्धेतील सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. स्पर्धेत प्रथम आलेल्या संघाला ५००१ रुपये, द्वितीय क्रमांकास ३००१ रुपये आणि तृतीय क्रमांकास २००१ रुपये, तसेच उत्तेजनार्थ एक हजार रुपयांची तीन बक्षिसे देण्यात आली. या स्पर्धेत २४ संघांनी सहभाग नोंदविला. सर्वच नरकासूर आकर्षक असे तयार केले होते. एकापेक्षा एक असे अप्रतिम कलाकृती असल्याने यातील क्रमांक निवडताना परीक्षकांचीही चांगलीच कसरत झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी येथेच सर्वात मोठी नरकासूर स्पर्धा आयोजित केली जाते. स्पर्धेत आलेले आकर्षक असे नरकासूर पाहण्यासाठी जिल्हाभरातून लोक येतात. येथील मोती तलावाच्या काठावर दिवाळीच्या पूर्वरात्री १० वाजता सर्व नरकासूर स्पर्धेच्या ठिकाणी उभे केलेले असतात. हे सर्व नरकासूर पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांची गर्दी असते. स्थानिक प्रेक्षकांबरोबर नरकासूर पाहण्यासाठी चाकरमान्यांची गर्दी असते. दिवाळीच्या सणाला सर्व चाकरमानी गावी दाखल होतात. यापूर्वीही आकर्षक असे नरकासूर तयार केले जात असत. परंतु त्यावेळी स्पर्धांचे आयोजन होत नसल्याने या कलाकृतींना मिळत नसे. मात्र, आता दरवर्षी स्पर्धा होत असल्याने नरकासुरांमध्ये नवनवीन कलाकृती पहायला मिळत आहेत. नरकासूर तयार करणाऱ्या युवकांच्या मंडळांची महिना ते दीड महिनाआधी जोरदार तयारी सुरू असते. नरकासूर तयार करण्याच्या सांगाड्यापासून ते रंगविण्यापर्यंत त्यांची रात्रंदिवस झोप उडालेली असते. आपल्या मंडळाचा नरकासूर अतिशय चांगला व्हावा, यासाठी हजारो रूपये मंडळांकडून खर्च केले जातात. दरम्यान, नरकासूर स्पर्धेत परीक्षक म्हणून प्रसन्ना कोदे, उमेश देऊलकर यांनी काम पाहिले. तसेच ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी शिवतेज मंडळाचे अध्यक्ष विशाल परब, उपाध्यक्ष आशुतोष घाडी, राकेश सावंत, सचिन सापळे, रमेश तावडे, सचिन घाडी, प्रसाद गावडे, प्रितेश आहिर, अमेय तेंडुलकर या सर्वांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन महेश डोंगरे यांनी केले. (वार्ताहर)परंपरा सुरू -- नरकासूर स्पर्धेचे आयोजन गोवा राज्यात मोठ्या प्रमाणात केले जाते. गोव्यामध्ये अनेक भागात स्पर्धा राबविल्या जातात. या लगतच असणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातही स्पर्धेची परंपरा सुरू करण्यात आली. जिल्ह्यातली सर्वात मोठी स्पर्धा अशी सावंतवाडी शहरात राबविली जाते. यामुळे याचा फायदा येथील स्थानिक कला मंडळींना होत आहे. नरकासूर स्पर्धेमध्ये ज्या काही त्रुटी काढल्या जातात, त्या लक्षात घेऊन पुढील वर्षी त्या सुधारून चांगली कला सादर करायला मिळते. यासाठीच हे स्पर्धेचे आयोजन करण्यात येतात. यावर्षी या स्पर्धेचे आयोजन नव्यानेच स्थापन केलेल्या शिवतेज मित्रमंडळ, सावंतवाडी यांनी केले होते. राऊळवाडा मंडळ नरकासूर स्पर्धेत प्रथमवेंगुर्ले : शिवप्रेरणा प्रतिष्ठान सिंधुदुर्गने आयोजित केलेल्या नरकासूर स्पर्धेत मोठ्या गटात राऊळवाडा येथील जबरदस्त मित्रमंडळाने, तर लहान गटात कॅम्प येथील आनंदवाडी मित्रमंडळाने प्रथम क्रमांक प्राप्त केला. बॅ. खर्डेकर महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या या नरकासूर स्पर्धेत लहान गटात २७ व मोठ्या गटात ७ स्पर्धकांनी मंडळे सहभागी झाली होती. लहान गटात द्वितीय क्रमांक कणकेवाडी-परबवाडा येथील सरस्वती बाल मित्रमंडळाने, तर तृतीय क्रमांक परबवाडा मित्रमंडळाने पटकावला. विजेत्यांना अनुक्रमे २,२२२ रुपये, १,५५५ रुपये व ७७७ रुपये अशी रोख पारितोषिके देण्यात आली. मोठ्या गटासाठी माणिक चौक येथील झक्कास मित्रमंडळ आणि गाडीअड्डा मित्रमंडळाला द्वितीय क्रमांक देण्यात आला. तर भटवाडी मित्रमंडळाने तृतीय क्रमांक मिळविला. विजेत्यांना अनुक्रमे ४,४४४ रुपये, ३,३३३ रुपयांची दोन व २,२२२ रुपये अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे परीक्षण महेंद्र मातोंडकर, संतोष वेंगुर्लेकर, अजय खानोेलकर व मनीष सातार्डेकर यांनी केले. वेंगुर्लेचे नगराध्यक्ष प्रसन्ना कुबल व शिवसेना प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे अध्यक्ष अभी वेंगुर्लेकर यांच्याहस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पंकज शिरसाट, प्रितम जाधव, दादा रगजी व प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. या नरकासूर स्पर्धेत माळीण दुर्घटना, लेक वाचवा, पर्यावरण बचाव, तंबाखू-गुटखाबंदी जनजागृती, स्वच्छता अभियान आदी विषयांवर आकर्षक असे नरकासूर साकारले होते. (प्रतिनिधी)२0 मंडळाचा सहभाग : कणकवलीतील बाजारपेठ मित्रमंडळाची नरकासूर स्पर्धा तेलीआळी, स्वराज्य ग्रुपला प्रथम क्रमांककणकवली : येथील बाजारपेठ मित्रमंडळाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या नरकासूर स्पर्धेत बालगटात तेलीआळी मित्रमंडळाने तर खुल्या गटात स्वराज्य ग्रुप कणकवलीने प्रथम क्रमांक मिळविला आहे.बाजारपेठ मित्रमंडळाने आयोजित केलेल्या नरकासूर स्पर्धेत २० मंडळांनी सहभाग घेतला होता. ढालकाठीपासून जवळच असलेल्या टोणेमारे बिल्डिंगसमोर ही स्पर्धा घेण्यात आली. गेले काही दिवस बच्चेकंपनीसह तरुणाई नरकासूर तयार करण्यामध्ये गुंग झाली होती. दीपोत्सवाला प्रारंभ झाल्यानंतर नरक चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला मंगळवारी कणकवली शहरातून विविध मंडळांनी धिंड काढत वाजत गाजत स्पर्धास्थळी तयार केलेले नरकासूर आणले. स्पर्धेतील बालगटात विद्यानगर मित्रमंडळाने द्वितीय तर जळकेवाडी मित्रमंडळाने तृतीय क्रमांक मिळविला. खुल्या गटात जळकेवाडी मित्रमंडळाने द्वितीय तर नागेश्वर मित्रमंडळाने तृतीय क्रमांक मिळविला. विजेत्या संघांना अनुक्रमे बालगटासाठी २ हजार, १५००, १ हजार रुपये तर खुल्या गटासाठी अनुक्रमे ३ हजार, २ हजार व १ हजार रुपयांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी संकेत बांदेकर, आदित्य सापळे, साई कोदे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
सावंतवाडीत नरकासूर स्पर्धा : २४ मंडळांचा उत्स्फूर्त सहभाग
By admin | Updated: October 23, 2014 00:03 IST