रहिम दलाल - रत्नागिरीजिल्ह्यातील १५८ आरोग्य उपकेंद्र इमारतींसाठी जागेच्या शोधात होती. त्यामुळे जिल्हा परिषद आरोग्य विभागाने उपकेंद्र अन्य ठिकाणी हलवण्याची अंतिम नोटीस दिल्याने काही ग्रामपंचायतींनी पुढाकार घेऊन जागा दिल्याने ११ उपकेंद्रांच्या जागेचा प्रश्न सुटला आहे. मात्र, ही उपकेंद्र अन्य ग्रामपंचायतींच्या हद्दीत हलवण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आरोग्य उपकेंद्र ही गरजू व गरीब रुग्णांच्या आरोग्यासाठी जीवनदायी ठरत आहेत. या उपकेंद्रांमध्ये किरकोळ उपचार करण्यात येत असले तरी रुग्णांना त्यातून जीवनदान मिळत आहे. मात्र, अनेक वर्षांपासून रुग्णांची सेवा बजावणाऱ्या या उपकेंद्रांच्या इमारतींसाठी कोणीही दाते जमीन देण्यासाठी पुढे येत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये ३७६ आरोग्य उपकेंद्र मंजूर आहेत. यापैकी १९२ उपकेंद्रांना इमारती आहेत, तर १५८ पैकी ११ उपकेंद्रांना इमारतींसाठी जमीन मिळाली आहे. या उपकेंद्रांसाठी इमारत बांधण्यासाठी लागणारी जमीन खरेदी करण्यासाठी शासनाकडून कोणतीही आर्थिक तरतूद करण्यात आलेली नाही. त्यासाठी जमीन विनामोबदला मिळावी आणि जागेचे बक्षीसपत्र केल्यानंतरच त्या ठिकाणी आरोग्य उपकेंद्र उभारता येणार आहे. जमिनीचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे या उपकेंद्रांना कोणीही जमीन देण्यास पुढे येत नाही. शासनाच्या आदेशानुसार जमीन उपलब्ध होत नसल्याने उपकेंद्र बांधता आले नसल्यास तेथून ते उपकेंद्र शेजारच्या गावामध्ये किंवा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात हलवावे, अशी सूचना आरोग्य विभागाला देण्यात आली आहे. त्यासाठी आरोग्य उपसंचालक आणि संचालक यांच्याकडून शासनाला प्रस्ताव सादर करण्यात यावा. संबंधित गावाची लोकसंख्या, तेथील परिस्थिती स्थिती, रस्ते, पाणी, वीज आदींची पाहणी करावी, अशी सूचनाही शासनाकडून देण्यात आली आहे. जिल्ह्यातील १५८ उपकेंद्रांना जमिनीची आवश्यकता असल्याने त्यांना जमीन मिळावी, यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाने वेळोवेळी तेथील लोकांना जमीन उपलब्ध करुन देण्याबाबत आवाहन केले होते. मात्र, ही बाब ग्रामपंचायतीने गांभीर्याने घेतलेली नाही. त्यामुळे आता आरोग्य विभागाने ग्रामपंचायतींना जमीन देण्याबाबत नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतरही जमीन उपलब्ध न झाल्यास ही उपकेंद्र लगतच्या गावामध्ये हलविण्यात येणार आहेत. मंजूर उपकेंद्रांना त्याच कार्यक्षेत्रातील अन्य ग्रामपंचायतींच्या हद्दीत ११ उपकेंद्रांना जागा मिळाल्याने ही उपकेंद्र स्थलांतरीत करण्यात येणार आहेत. त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.तालुका स्थलांतरित उपकेंद्रांची ठिकाणेखेडमेटे, शेल्डी, निळीकचिपळूणवैजीसंगमेश्वरकुरधुंडाराजापूरकोळंबगुहागरकौंढर काळसूर, भातगांव, तिसंग.दापोलीदेगावलांजामाजळप्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालय असलेल्या गावात उपकेंद्रासाठी स्वतंत्र इमारत बांधण्यात येऊ नये, अशी सक्त सूचना शासनाकडून परिपत्रकाद्वारे काढण्यात आली आहे.उपकेंद्र मंजूर असतानाही जागा न मिळाल्याने त्याच कार्यक्षेत्रातील अन्य ग्रामपंचायतींच्या हद्दीत जागा उपलब्ध झाल्याने जिल्ह्यातील ११ उपकेंद्र स्थलांतरीत करण्यात येणार आहेत. त्यामुळे काही रुग्णांची सोय, तर काही रूग्णांना हेलपाटा मारावा लागणार आहे.
अकरा आरोग्य उपकेंद्रे अन्यत्र हलवण्याच्या हालचाली
By admin | Updated: August 26, 2015 23:16 IST