रत्नागिरी : दिवाळी पाडव्यादिवशीच रत्नागिरीत चोरी करून पसार झालेल्या चोरट्याला स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अवघ्या आठ दिवसांत अटक केली. चंदगड येथील बसथांब्यावर संशयित सागर शांताराम कांबळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले. चोरलेले दागिने त्याने रत्नागिरीतील बॅँकेत गहाण ठेवल्याचे तपासात निष्पन्न झाले. हे दागिने व त्याच्याकडील रोख रक्कम असा तीन लाख ९४ हजार १४० रुपयांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे. शहरातील टिळक आळी येथे २४ आॅक्टोबर २०१४ रोजी स्वामिनी जगदीश मयेकर या शेजारीच राहणाऱ्या आपल्या आईकडे गेल्या असता अज्ञात चोरट्याने मयेकर यांच्या घराचा दरवाजा उघडा असल्याचा फायदा घेत आतील पर्स चोरून नेली होती. या पर्समध्ये सोन्याचे मंगळसूत्र, हार, बांगड्या, अंगठी असा दहा तोळे वजनाचा ऐवज, एक मोबाईल तसेच रोख रक्कम मिळून १ लाख ५४ हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला होता. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. तपास करणारे स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पथक अज्ञात आरोपीबाबत माहिती घेत असताना संशयित व्यक्ती रोशन सुरेश मोरे (रा. गवाणे, ता. लांजा) याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. त्याने त्याचा मित्र सागर कांबळे (रा. चंदगड, जि. कोल्हापूर) याने काही सोन्याचे दागिने आयसीआयसीआय बँक शाखा, गाडीतळ, रत्नागिरी येथे रोशन मोरे याच्या नावे गहाण ठेवून, एक लाख ७५ हजार रुपये बँकेतून कर्ज स्वरूपात घेतल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यावरून या पथकाने संबंधित बँकेत दागिन्यांची खात्री केली.हे दागिने त्याठिकाणी सापडून आल्याने सागर शांताराम कांबळे यानेच हा गुन्हा केल्याची पोलिसांची खात्री पटली. या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक चंदगड येथे पाठविण्यात आले. सडे, गुडवले (ता. चंदगड) येथे एस. टी. थांब्यावर हा संशयित आरोपी पोलिसांना सापडला. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याच्याकडून एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल हॅण्डसेट (चोरीच्या पैशांतून नवीन खरेदी केलेला), चोरलेला मोबाईल हॅण्डसेट, सोन्याची अंगठी, सोन्याची सटवी, चांदीची साखळी व रोख रक्कम १ लाख ३ हजार ६००, असा १ लाख २४ हजार ४४० रुपयांचा ऐवज त्याच्याकडून हस्तगत करण्यात आला आहे. तसेच त्याने आयसीआयसीआय बँक, गाडीतळ शाखेत गहाण ठेवलेले दागिने पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. या गुन्ह्याच्या तपासासाठी नियुक्त पथकात गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक एस. एल. पाटील, सहायक पोलीस फौजदार मामा कदम, पोलीस हवालदार दिनेश आखाडे, पोलीस नाईक सुशील पंडित, उदय वाजे, प्रवीण बर्गे, वैभव मोरे, गुरू महाडिक, रमीझ शेख, जमीर पटेल, संदीप मालप, पांडू जवरत, सागर साळवी, दत्ता हारुगडे, संदीप काशिद, सचिन पवार यांचा समावेश होता. चोरट्याचे लॉकर ?चोरट्याने दागिने गहाण ठेवले असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात त्याने बॅँकेत लॉकरमध्ये ठेवल्याची चर्चा आहे. चोरट्यांची बॅँक लॉकर्सही आहेत का, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. (प्रतिनिधी)
चोरी केलेले दागिने ठेवले बॅँकेत गहाण
By admin | Updated: October 31, 2014 23:36 IST