असगोली : गेल्या काही वर्षांपासून गौण खनिज उत्खननाला असणाऱ्या बंदीमुळे कोकणात हा व्यवसाय दोन नंबरचा काळा व्यवसाय ठरला आहे. यातून अनेक अवैध व्यवहार सुरू आहेत. परिणामी याची झळ सर्वसामान्य जनतेला सोसावी लागत असून, भरमसाठ किमतीने चिरे व वाळू खरेदी करावी लागत आहे, अशी कैफियत महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याजवळ गुहागरचे माजी आमदार डॉ. विनय नातूंसह भाजपच्या शिष्टमंडळाने मांडली आहे. यावर येत्या १५ दिवसात बैठक बोलावण्याचे आश्वासन खडसे यांनी शिष्टमंडळाला दिले. कोकणातील या व्यवसायाबाबत माजी आमदार डॉ. विनय नातू व गुहागर विधानसभा भाजपच्या शिष्टमंडळाने महसूलमंत्री एकनाथ खडसे यांची भेट घेऊन याबाबत सविस्तर चर्चा करुन या व्यवसायाला शासनाची कायद्याच्या चाकोरीत रितसर परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. यावेळी कोकणातील या व्यवसायाबाबत माहिती देताना गौण खनिजावरील बंदीमुळे हा व्यवसाय अवैध व्यवसाय म्हणून गणला गेला आहे. परिणामी चिरे व वाळू या दोन्ही वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. अनेकांची रोजीरोटी हिरावून घेतली गेली आहे. यामुळे राजकीय ताकदीचा वापर करुन महसूल अधिकाऱ्यांचा वरदहस्त वापरत हे अवैध व्यवसाय चालूच ठेवले. मात्र, यामुळे सर्वसाधारण जनतेचे आर्थिक शोषण होत आहे. चिरेखाणी व हातपाटी वाळूधारकांची व्यथा थांबवून त्यांना रॉयल्टी भरुन परवानगी द्यावी, अशी मागणी केली. यावर महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी आपल्या स्वीय सचिवांना पुढील पंधरा दिवसांत रत्नागिरी जिल्हाधिकारी, या व्यवसायासंबंधी येणाऱ्या सर्व खात्यांचे अधिकारी, चिरेखाण मालक, नोंदणीकृत हातपाटी वाळू धारक व डॉ. विनय नातू यांच्यासमवेत आपली बैठक बोलावण्याचे आदेश दिले आहेत. या समस्येवर वेळीच तोडगा काढण्याचे आश्वासनही यावेळी महसूलमंत्र्यांनी दिले आहे. यावेळी डॉ. विनय नातू यांच्यासह भाजपाचे प्रदेश सदस्य प्रशांत शिरगावकर, विठ्ठल भालेकर, तालुका अध्यक्ष विश्वनाथ अडूरकर, जिल्हा महिला अध्यक्ष नीलम गोंधळी, स्मिता धामणस्कर, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष नीलेश सुर्वे, तालुका उपाध्यक्ष महेश कोळवणकर, तालुका सरचिटणीस श्रीकांत महाजन, श्रध्दा घाडे, अशोक पारदळे, संतोष भडवळकर, विनोद चाळके, राजू रेडीज, सुरेश चौगुले यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर) कोकणातील गौणखनिजावरील बंदीमुळे निर्माण झालेल्या चिरे व वाळू व्यावसायिकांच्या समस्या माजी आमदार डॉ. विनय नातू व गुहागर भाजपच्या शिष्टमंडळाने महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यासमोर मांडल्या. माजी आमदार विनय नातूंसह भाजपाच्या शिष्टमंडळाने घेतली एकनाथ खडसेंची भेट. अनेक व्यावसायिक बेघर झाल्याची कैफियत. नोंदणीकृत हातपाटी वाळूधारक, चिरेखाण मालकांची बैठक बोलावण्याचे दिले आश्वासन.
गौण खनिजबाबत पंधरा दिवसांत बैठक
By admin | Updated: November 27, 2014 00:25 IST