रत्नागिरी : राष्ट्रीय फलोत्पादन योजनेंतर्गत सुरू असलेली यांत्रिकीकरण योजना बंद करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रास कटर, पॉवर स्प्रेअरचे मिळून जिल्हाभरातील सुमारे २४० शेतकऱ्यांचे प्रस्ताव रखडले आहेत.राष्ट्रीय फलोत्पादन योजनेंतर्गत पंचायत समितीची यांत्रिकीकरण योजना चालू वर्षापासून शासनाने बंद केली आहे. या योजनेंतर्गत ५० ते ७५ टक्के अनुदानाने शेतकऱ्यांना यांत्रिक अवजारे पुरविण्यात येत होती. ही योजना शासनाने बंद केली असली तरी पॉवर टिलर व मोठ्या ट्रॅक्टरकरिता अनुदान सुरू ठेवले आहे. पॉवर टिलरचा वापर जिल्ह्यात नांगरणीकरिता करण्यात येत असला तरी त्याचे प्रमाण अल्प आहे. तर मोठ्या ट्रॅक्टरचा वापर जिल्ह्यात करण्यात येत नाही. एकूणच शासनाच्या निरूत्साही धोरणामुळे जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत आले आहेत.ग्रासकटर व पॉवर स्पेअरसारख्या यांत्रिक अवजारांमुळे शेतकऱ्यांच्या वेळेची बचत व मजूरीचा खर्च वाचत होता. ग्रासकटरमुळे बागेतील गवत कटाई कमी वेळेत पूर्ण होत होती. शिवाय सफाईसाठी मजुरांवर केला जाणारा खर्चदेखील वाचत होता. तसेच पॉवर स्प्रेअरमुळे कीटकनाशक फवारणी योग्यरित्या व वेळेत पूर्ण करणे शक्य होत होते.ग्रासकटरची किंमत १८००० रूपयांपासून ४५ हजार रूपयांपर्यंत आहे. पॉवर स्पेअरची किंमत ३४ हजारांपासून ५० हजारांपर्यंत आहे. ५० टक्के सबसिडीमुळे शेतकऱ्यांना निम्मी, तर ७५ टक्के सबसिडीमुळे शेतकऱ्यांना २५ टक्के रक्कम मिळत असे. वास्तविक सवलतीच्या दरात मिळणाऱ्या अवजारामुळे शेतकऱ्यांचा फायदा होत होता.गतवर्षी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयातर्फे यांत्रिक अवजारांसाठी २ कोटी ३० लाखाचे थेट अनुदान वितरीत करण्यात आले होते. परंतु अनुदान बंद केल्याने शेतकऱ्यांना आता पूर्ण किमतीने पंप किंवा कटर खरेदी करावा लागणार आहे. यावर्षी ४५० शेतकऱ्यांनी प्रस्ताव पाठविले होते. मात्र, योजना बंद झाल्याने शेतकऱ्यांच्या प्रस्तावावर विरजन पडले आहे. (प्रतिनिधी)
यांत्रिकीकरण योजना बंद
By admin | Updated: November 27, 2014 00:25 IST