सिंधुदुर्गनगरी : समुद्रमार्गे दहशतवादी हल्ला होण्याचा इशारा देण्यात आल्यानंतर जिल्ह्यातील सागरी सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘हाय अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. सागरी किनारी भागातील सहा पोलीस ठाण्यांनाही दक्ष राहण्याच्या सूचना सागरी सुरक्षा विभागाकडून देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात रमजानचा महिना सुरू आहे, तर काही दिवसांवर दहिहंडी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव असे विविध सण असल्याने गर्दीची आणि संवेदनशील ठिकाणे पाहून दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता राज्याच्या सुरक्षा यंत्रणेने वर्तविली आहे. तसे आदेश सिंधुदुर्ग जिल्हा सागरी सुरक्षा यंत्रणेला देण्यात आले असून, जिल्ह्यात ‘हाय अलर्ट’ जारी करण्याबाबत सांगण्यात आले आहे. त्यानुसार सागर सुरक्षा विभागाने संबंधित यंत्रणांना ‘दक्ष’ राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याला १२० किलोमीटरचा विस्तृत असा समुद्रकिनारा लाभल्याने त्या संबंधित येणाऱ्या विजयदुर्ग, आचरा, देवगड, मालवण, निवती व वेंगुर्ला या पोलीस ठाण्याला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दहशतवादी धोक्याच्या पार्श्वभूमीवर सध्या किनारपट्टीच्या नजीक असलेल्या ३४४ सागर रक्षक सदस्य व ५४ सागरी किनारी राहणाऱ्या दलांना ‘बल्क’मार्फत एस.एम.एस. करून अलर्ट राहण्यास सांगण्यात आले आहे. सागर रक्षक दलाचे पाच सदस्य हे एका एका गावात ठेवले आहेत. संशयित वस्तू दिसल्यास १०९३ डायल करा समुद्रात एखादी संशयित बोट फिरताना दिसल्यास किंवा संशयास्पद वस्तू आढळून आल्यास संबंधितांनी तत्काळ १०९३ या टोल फ्री नंबरवर संपर्क साधून याची माहिती द्यावी, यावर तत्काळ कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
सागरी यंत्रणा ‘हाय अलर्ट’
By admin | Updated: July 7, 2015 01:01 IST