मालवण : मालवण धुरीवाडा येथील मूर्तीकार हेमंत रामाडे यांच्या ‘श्री कला केंद्र’ यांच्या मूर्तीशाळेतून मुंबई येथे आगळी वेगळी गणेशाची मूर्ती रवाना होणार आहे. मुंबई-परेल येथील तकदीर टेरेस सार्वजनिक गणेशोत्सवासाठी आकर्षक व सुबक गणेशमूर्ती बनविण्यात आली असून ‘इको फ्रेंडली’ स्पर्धेत सहभागी होणार आहे. मालवण येथील किशोर कांदळगावकर यांनी मूर्तीची कल्पना दिली असून गणेशमूर्र्तीचे रंगकाम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या काही दिवसात मुंबई येथे मूर्ती रवाना होणार असून शहरातील नागरिक मूर्ती पाहण्यासाठी मूर्तीशाळेत गर्दी करत आहेत. कांदळगावकर यांनी आयर्लंड येथील एका संग्रहालयातील अशा पद्धतीची गणेशमूर्ती एका पुस्तकात पाहिली होती. ती मूर्ती आगळी वेगळी असल्याने ते छायाचित्र पाहून प्रेरित झाले. शहरातील मूर्तीकार हेमंत रामाडे यांच्या ‘श्री कला केंद्र’ मूर्र्तीशाळेत विशेष गणेशमूर्र्ती बनविण्यास सांगितली. या अनोख्या गणेशमूर्र्तीत गणपती तबला-डग्गा वादन करत असून गणेशाच्या भजनाला सहा मूषक संगीतसाथ देत आहेत, असे वर्णन करणारी मूर्ती साकारण्यात आली आहे. हे मूषक मालवणचे नगराध्यक्ष अशोक तोडणकर यांनी तयार केले आहेत. गणपती साकारण्यासाठी श्री कला केंद्रातील हेमंत रामाडे यांच्यासह बंड्या गायकवाड, राकेश वेंगुर्लेकर, योगेश धुरी तसेच त्याच्या अन्य सहकाऱ्यांकडून सहकार्य लाभले आहे. कांदळगावकर हेही मूर्तीकार आहेत. त्यांनी आतापर्यंत शंख शिंपले, काजू बी, साखर, दुर्वा, वाळू (रेती) यांच्यापासून इको फ्रेंडली गणेशमूर्ती साकारल्या जात आहेत. मालवण किल्ले सिंधुदुर्ग येथील एकमेव शिवराजेश्वर मंदिरात कांदळगावकर यांची वाळूच्या साह्याने साकारण्यात आलेली मूर्ती ठेवण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
मालवणच्या इको फ्रेंडली ‘बाप्पां’ची मुंबईवारी
By admin | Updated: August 21, 2016 22:44 IST