रत्नागिरी : जिल्ह्यात आलेल्या अपयशानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी पुन्हा एकदा चिंतनच्या प्रेमात पडणार आहेत. या दोन्ही पक्षांनी चिंतन करण्यासाठी चिपळूणची निवड केली आहे. चिपळूण शहर राष्ट्रवादी आणि चिपळूण, संगमेश्वर तसेच गुहागरातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांची चिंतन बैठक घेण्यात येणार आहे. दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.निवडणुकीत अपयश आल्यानंतर चिंतन करण्याची परंपरा काँग्रेस आणि राष्ट्रवादी याही निवडणुकीत जपणार आहे. विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात काँग्रेस भुईसपाट झाली. त्यामुळे कार्यकर्ते खजील झाले आहेत. जिल्ह्यातील काँग्रेसच्या चार उमेदवारांना आपली अनामत रक्कमही वाचवता आली नाही. राष्ट्रीय पक्षावर आलेली ही कठीण वेळ कार्यकर्त्यांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांनी आता आपापल्या परीने चिंतन करण्याचा निर्णय घेतला.काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अशोक जाधव यांनी गुहागर, चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यातील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची ३१ आॅक्टोबर रोजी चिपळुणात चिंतन बैठक होणार असल्याचे म्हटले आहे. प्रभारी जिल्हाध्यक्ष सुरेश कातकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक होणार आहे. जनतेने दिलेला कौल आपणाला मान्य आहे. मात्र, आजही कोकणातील प्रमुख पक्षात काँग्रेसची गणना होते. आघाडीत झालेली फाटाफूट यावेळी पक्षासाठी हानिकारक ठरली. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आलेली मरगळ दूर करण्यासाठी ही चिंतन बैठक असल्याचे जाधव यांनी म्हटले आहे.जिल्ह्यात राष्ट्रवादीने दोन जागा मिळवल्या असल्या तरी चिपळुणातील महत्त्वाची जागा खात्री असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसने केवळ अंतर्गत मतभेदामुळे गमावली आहे.चिपळूण शहरासाठी अपेक्षित यश न आल्याने व मतदारसंघातील अन्य भागातही कमी पडल्याने राष्ट्रवादीला चिपळुणात पराभव पत्करावा लागला. त्यामुळे दिवाळीनंतर राष्ट्रवादीत चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पराभवाची कारणमिमांसा व भविष्यात घ्यावी लागणारी दक्षता याची दिशा ठरवण्यात येणार असल्याची माहिती शहराध्यक्ष श्रीकृष्ण खेडेकर यांनी दिली. (प्रतिनिधी)खचणार नाही... लढणार!गेल्या दोन निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला चिपळूण शहरात अपेक्षित मताधिक्य मिळाले नाही. त्यामुळे राष्ट्रवादीला अपयश आले. याबाबत दिवाळीनंतर होणाऱ्या चिंतन बैठकीत आम्ही आत्मपरीक्षण करणार आहोत.- श्रीकृष्ण खेडेकर, शहराध्यक्ष, राष्ट्रवादीजिल्ह्यात काँग्रेसचा झालेला पराभव आम्ही मान्य केला आहे. मात्र, काँग्रेस पक्ष हा कोकणातील प्रमुख पक्षांपैकी एक आहे. त्यामुळे आम्ही खचून जाणार नाही. फक्त सततच्या पराभवामुळे कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा आत्मविश्वास मिळवण्यासाठी चिपळुणात चिंतन बैठक आयोजित करण्यात आली आहे.- अशोक जाधव, काँग्रेस
काँग्रेस-राष्ट्रवादी चिंतनच्या प्रेमात
By admin | Updated: October 23, 2014 22:54 IST