कसई दोडामार्ग : विद्यापीठ कार्यक्षेत्रात ७२९ महाविद्यालये असून अजूनही या विभागाच्या विस्तारास भरपूर वाव आहे. आयुष्यभर शिक्षण घेत असताना या शिक्षणाचा उपयोग करत समाजातील तळागाळातील घटकांना साक्षर करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाच्या ‘आजीवन अध्ययन व विस्तार विभागा’चे सहाय्यक प्राध्यापक डॉ. कुणाल जाधव यांनी केले. येथील लक्ष्मीबाई हळबे महाविद्यालयात आयोजित केलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयातील आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या द्वितीय सत्रातील प्रशिक्षण शिबिरात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. व्ही. ए. पाटील होते. यावेळी व्यासपीठावर क्षेत्रसमन्वयक प्राचार्य यशोधन गवस, प्रा. अरुण पणदूरकर, प्रा. डॉ. आर. एस. इंगळे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस सरस्वतीच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. पाटील यांनी दोडामार्गची ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगून आजीवन अध्ययन विभागाची वाटचाल प्रभावीपणे होत असल्याबाबत समाधान व्यक्त केले. प्रा. पणदूरकर यांनी शिक्षणाचा समाजासाठी सातत्याने वापर होण्याची गरज प्रतिपादित केली. प्राचार्य गवस यांनी पाहुण्यांचा परिचय केला. यावेळी प्रा. डॉ. जाधव यांचा प्राचार्य डॉ. पाटील यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. दुसऱ्या सत्रात प्रा. यशोधन गवस, प्रा. एम. ए. ठाकूर, प्रा. राजेंद्र मुंबारकर, प्रा. एस. एन. पाटील आदींनी विचार मांडले. प्रास्ताविक, स्वागत प्राचार्य डॉ. व्ही. ए. पाटील यांनी केले. शिबिरात जिल्ह्यातील सर्व २४ वरिष्ठ महाविद्यालयांचे विद्यार्थी, व्यवस्थापक, विस्तार शिक्षक व क्षेत्र समन्वकांनी सहभाग घेतला. (वार्ताहर)
तळागाळातील घटकांना साक्षर करावे
By admin | Updated: November 28, 2014 00:13 IST