खाडीपट्टा : खेड तालुक्यातील कोतवली सोनगाव येथील जंगलमय भागात बिबट्याचे शव आढळून आल्यानंतर त्याची १६ नखे गायब झाली होती. मात्र ८ दिवसानंतर त्यापैकी १२ नखे त्याच जंगलात आढळून आली होती. त्यामुळे येथील जंगलात या नखांची तस्करी होत असल्याचे समोर आले आहे. मात्र, वर्ष उलटून गेले तरी या प्रकरणी अद्याप कोणालाच ताब्यात घेण्यात आले नसल्याचे या प्रकरणाबाबत संशय व्यक्त होत आहे. या घटनेप्रकरणी वन अधिकाऱ्यांनी कोतवली येथील जंगलात जावून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, या प्रयत्नात सातत्य नसल्याने तपासाची चक्र उलट्या दिशेने फिरत असल्याची चर्चा आता तालुक्यात सुरु झाली आहे. वाघाची कातडी काढण्याचा प्रयत्न असतानाच ग्रामस्थांची हालचाल पाहून तस्करांनी पलायन केले असल्याचा अंदाज घटनेदरम्यान वर्तवण्यात त्यावेळी आला होता. तसेच कोतवली-सोनगाव या जंगलमय असलेल्या भागात पहिल्यांदाच वाघाची शिकार झाली. वाघाची सर्व नखे कापून घेण्यात आली होती. यावरुन वाघाची तस्करी करणाऱ्या टोळीचा यामध्ये हात असण्याची शक्यता तालुक्यात वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणाचा शोध घेण्यासाठी येथील वन अधिकाऱ्यांनी वारंवार जंगल परिसर पिंजून काढला. मात्र, अद्याप या प्रकरणी काहीही हाती लागले नसल्याने आता या प्रकरणी खेड पोलिसांची मदत मागितली असल्याचे व शोध मोहिम सुरु असल्याचे खेडचे वनपाल एस.जी. सुतार यांनी लोकमतजवळ सांगितले.सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वडगाव, कळंबणी, चकदेव, विहाळी, कांदोशी येथील जंगलात तर खाडीपट्टा भागातील जंगलात अद्याप बिबट्यांचा संचार असल्याच्या शक्यतेला वन अधिकाऱ्यांकडून पुष्टीही मिळाली आहे. मात्र येथील जंगलात बिबट्याची शिकार झालेली आठवत नाही. यामुळे कोतवली-सोनगाव येथील जंगलात मृतावस्थेत आढळलेल्या बिबट्याविषयी वन अधिकाऱ्यांनीही आश्चर्य व्यक्त केले आहे. ५ वर्षापूर्वी खेड बसस्थानकावर वाघाची कातडी बाळगलेल्या दोघांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले होते. त्यांनी कोल्हापूर येथून ही कातडी आणल्याची कबुलीही त्यावेळी दिली होती. या प्रकरणी गुंतलेल्या काहींना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र, कोतवली-सोनगाव येथे घडलेल्या घटनेप्रकरणी अधिकारीही गोंधळून गेले आहेत. मात्र, आता वन अधिकाऱ्यांनी खेड पोलिसांची या प्रकरणी मदत मागितल्याने लवकरच आरोपींना पकडण्यात यश येणार असल्याची आशा वनअधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. (वार्ताहर)
बिबट्याच्या नखांची विक्री
By admin | Updated: September 25, 2014 23:31 IST