सिंधुदुर्गनगरी : जमीन मोजणीचा नकाशा देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना पकडलेल्या कुडाळ भूमिअभिलेख कार्यालयाचे तत्कालीन उपअधीक्षक मोहन बापू ओटवणेकर (वय ५८, सावंतवाडी गणेशनगर) यांना सिंधुदुर्गनगरी येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे विशेष न्यायाधीश डी. डब्ल्यू. मोडक यांनी चार वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व दोन हजार रुपये दंड ठोठावला. ओरोस-सावंतवाडा येथील सलीम महम्मद शेख यांनी आपल्या ग्रॅनाईड खनिकर्माच्या जमिनीच्या मोजणीसाठी कुडाळ भूमिअभिलेख कार्यालयात अर्ज दाखल केला होता. शेख यांची पत्नी खुदेजा बानू हिच्या नावाने असलेला हा खनिकर्म पट्टा नारूर (कुडाळ) येथे होता. मोजणीसाठी मोहन बापू ओटवणेकर यांच्याकडे भूमिअभिलेख कार्यालयात अर्ज केला होता. ओटवणेकर यांनी मोजणी केली. मात्र, नकाशे देण्याचे बाकी होते. या नकाशाच्या मागणीसाठी सलीम शेख वारंवार भूमिअभिलेख कार्यालयात जात. मात्र, ओटवणेकर नकाशा देण्यास टाळाटाळ करीत. १० जानेवारी २०११ रोजी शेख कुडाळला भूमिअभिलेख कार्यालयात गेले असता ओटवणेकर याने त्यांच्याकडून नकाशासाठी दोन हजार रुपयांची मागणी केली. यावरून शेख यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याप्रकरणी तक्रार दाखल केली.दरम्यान, या तक्रारीनुसार १२ जानेवारी २०११ रोजी कार्यालयातच ओटवणेकर याला लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे तत्कालीन उपअधीक्षक दीपक बांदेकर यांनी पकडले. त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायदा कलम क्र. ७ तसेच १३ (१) (डी) त्यासोबत कलम १३ (२) अन्वये गुन्हा दाखल केला. यावर आज, मंगळवारी अंतिम सुनावणी होऊन ओटवणेकर याला प्रत्येकी चार वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा, तर दोन हजार रुपये दंडही ठोठावला. दंड न भरल्यास सहा महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. या शिक्षा एकत्र भोगावयाच्या आहेत. सुनावणी दरम्यान ११ साक्षीदार तपासले. अॅड. अमोल सामंत यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले. (प्रतिनिधी)
भूमिअभिलेख उपअधीक्षकाला सश्रम कारावासाची शिक्षा
By admin | Updated: December 31, 2014 00:21 IST