कुडाळ : पावशी ग्रामस्थांनी महामार्गाची मोजणी रोखली. नियमानुसार मोजणी न झाल्यास आम्ही यापुढे मोजणी करू देणार नाही, भूधारकांना योग्य न्याय द्या, अशा मागण्या करून सुमारे दोन तास पावशी ग्रामस्थांनी प्रांताधिकाऱ्यांशी चर्चा केली. अखेर यासंदर्भात पावशी ग्रामस्थांची शनिवारी दुपारी ३ वाजता बैठक आयोजित करण्याचे आश्वासन प्रांताधिकारी रवींद्र बोंबले यांनी दिले. जिल्ह्यात होणाऱ्या चौपदरीकरण महामार्गाच्या मोजणी संदर्भात जिल्ह्यात ठिकठिकाणी उद्रेक होत असून, पावशी येथील ही मोजणी शुक्रवारी सकाळी ग्रामस्थांनी रोखली. मोजणी रोखल्यानंतर घटनास्थळी प्रांताधिकारी रवींद्र बोंबले यांनी पावशी ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी पावशी सरपंच श्रीपाद तवटे यांनी प्रांताधिकारी बोंबले यांना सांगितले की, मोजणी सुरू असलेल्या ठिकाणच्या भूधारकांना नोटिसा आलेल्या नाहीत. कोणाच्याही घरादाराकडे, कोणाच्याही जमिनीत पूर्वसूचना न देता, नोटिसा न देता मोजणी कशी काय करता, असा सवाल त्यांनी केला. जोपर्यंत येथील प्रकल्पग्रस्त भूधारकांना योग्य पध्दतीने नोटिसा येत नाहीत, त्यांचा जमिनीचा मोबदला किती मिळणार, हे समजत नाही, तोपर्यंत येथील मोजणी होऊ देणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थ व लोकप्रतिनिधींनी घेतली असल्याचे तवटे यांनी सांगितले. पावशी येथील प्रकल्पग्रस्तांची बैठक प्रांताधिकारी रवींद्र बोंबले यांनी शनिवारी दुपारी ३ वाजता आयोजित केली असून, बैठकीनंतरच मोजणी संदर्भात योग्य तो निर्णय घेऊ, असे ग्रामस्थांनी सांगितले. अखेर ग्रामस्थांनी भूमोजणीला विरोध केल्यामुळे या गावातील मोजणी शुक्रवारी बंद ठेवण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक प्रकाश बिराजदार, पावशी सरपंच श्रीपाद तवटे, पंचायत समिती सदस्य आनंद भोगले यांच्यासह ग्रामस्थ बंटी तुळसुलकर, रवी तुळसकर, बाबू शेलटे, सुंदर तुळसकर, संजय केसरकर, दादा पावसकर, अरुण शेलटे, सुभाष वाटवे तसेच इतर ६० ते ७० ग्रामस्थ उपस्थित होते. (प्रतिनिधी)पावशी गावात बैठक घ्या : ग्रामस्थमहामार्गाच्या चौपदरीकरणात लोकांच्या जमिनी, घरेदारे, शेती-बागायती जाणार आहे. याबाबत त्या- त्या गावातील प्रकल्पग्रस्तांबरोबर प्रशासनाने प्रत्येक गावात बैठक आयोजित करून योग्य ती माहिती देणे आवश्यक आहे. मात्र, अशाप्रकारची बैठक पावशी गावात घेतली नसल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त करत बैठकीची मागणी यावेळी केली. योग्य माहिती द्या : तवटेयेथील प्रकल्पग्रस्त भूधारकांना योग्य ती माहिती द्या. त्यांना फसवू नका. लोकशाही पध्दतीने जेवढे काही होत असेल ते करा, अशी मागणी पावशीचे सरपंच तवटे यांनी प्रांताधिकारी रवींद्र बोेंबले यांच्याकडे केली.
चौपदरीकरणाबाबतची जमीन मोजणी रोखली
By admin | Updated: May 29, 2015 23:47 IST