वेंगुर्ले : हापूस आंब्यामधील साका, वर्षाआड फलधारणा व हवामान बदलाव संवेदनशीलता या सर्व बाबींवर मात करण्याकरिता डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत येथील वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्रमार्फत ‘कोकण सम्राट’ ही आंब्याची नवीन जात विकसित करण्यात आली आहे. आंबा हे कोकणचे सर्वात महत्त्वाचे फळपिक आहे. कोकणात आंब्यासाठीचे १ लाख ८३ हजार हेक्टर एवढे क्षेत्र आहे. यामध्ये सर्वात जास्त लागवड ही हापूस या आंबा जातीची आहे. या जातीच्या फळाची टिकून राहण्याची क्षमता उत्तम असून फळाचा आकार व रंग अतिशय आकर्षक आहे. तसेच हापूस जातीच्या फळांचा स्वादही उत्तम आहे. असे असले तरी हापूस फळांमधील साका, वर्षाआड फलधारणा आणि हवामान बदलाची संवेदनशीलता हे दुर्गुण आढळतात. या सर्व बाबींवर मात करण्याकरिता येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्राने ‘कोकण सम्राट’ ही आंब्याची जात विकसित करून या जातीच्या लागवडीकरिता दापोली कोकण कृषी विद्यापीठात आयोजित केलेल्या संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीच्या बैठकीमध्ये मान्यता घेऊन कोकणात लागवडीसाठी शिफारस करण्यात आली आहे. ‘कोकण सम्राट’ ही नवीन जात हापूस आणि ‘टॉमी अॅटकिन्स’ या परदेशी आंब्याची जात यांचा संकर करून विकसीत करण्यात आली आहे. कोकण सम्राट या नवीन आंब्याच्या जातीची म्हणजे हापूस या आंबा जातीशी परदेशी आंबा जातीचा संकर केलेली देशातील पहिली आंबा जात आहे. झाडाची वाढ चांगली होत असून सरासरी प्रतिझाड १७ किलो उत्पन्न देते. मोठ्या आकाराची फळे असून फळाचे वजन ४८४.६० ग्रॅम भरते. गराचे प्रमाण ८१.९४ टक्के आहे. आम्ल आणि शर्कराचे गुणोत्तर हे सुयोग्य असून फळाला मधुर स्वाद आहे. संयुक्त फुलाचे प्रमाण २७.५२ टक्के आहे. सन २०१५ मध्ये या जातीची कलमे येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात शेतकऱ्यांकरिता मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. कोकण सम्राट ही आंब्याची नवीन जात विकसित करण्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. किसन लवांडे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. (प्रतिनिधी)
‘कोकण सम्राट’ आंब्याची
By admin | Updated: July 18, 2014 23:15 IST