रत्नागिरी : बाल व युवा पिढीवर संस्कारांचे महत्त्व आणि शंभूराजांनंतर मराठेशाहीचा देदिप्यमान इतिहास जागवणारी कीर्तने दि. १ ते ५ जानेवारी दरम्यान रंगणार आहेत. येथील कीर्तनसंध्या संस्थेत ‘हिंदुत्त्वाचा अंगार फुलवण्यासाठी’ राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे कीर्तने करणार आहेत.माळनाका येथील रा. भा. शिर्के प्रशालेच्या भाऊराव देसाई क्रीडांगणावर दररोज सायंकाळी ६.३० ते १० वाजेपर्यंत कीर्तने होणार आहेत. कीर्तनसंध्येचे यंदा चौथे वर्ष असून, यापूर्वी संस्थेने केलेल्या महोत्सवांना उदंड प्रतिसाद मिळाला आहे. जून २०१२मध्ये धर्मवीर संभाजी महाराज, २०१३मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस आणि २०१४मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवर आफळेबुवांची कीर्तने आयोजित केली. शिवाजी महाराजांवरील कीर्तनासाठी प्रतिदिन सात ते नऊ हजार कीर्तनप्रेमी उपस्थित होते.उत्तररंगामध्ये छत्रपती संभाजी महाराजांनंतरचा काळ आणि पेशवाईपर्यंतचा आढावा घेणार आहेत. तसेच ताराराणी, येसूबाई, संताजी-धनाजी, रामचंद्र अमात्य पेशवाई आदींवर कीर्तन सादर करतील.कीर्तनप्रेमींसाठी रत्नागिरी एस. टी. आगाराने रात्री घरी जाण्यासाठी खेडशीपर्यंत जादा एस. टी. गाडी ठेवली आहे. एस. टी. बसस्थानकातून सुटणारी ही गाडी माळनाका येथे सव्वादहा वाजता येईल. स्वत:चे तिकीट काढून कीर्तनप्रेमीनी प्रवास करावयाचा आहे, असे कीतन संध्या संस्थेतर्फे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)भव्य रंगमंंचावर उभे राहणार कीर्तनया कीर्तनमालेसाठी ३२ बाय २० फुटांचे व्यासपीठ उभारण्यात आले आहे. कीर्तनस्थळी दोन एलसीडी स्क्रिनवर चित्रीकरण दाखवण्याची व्यवस्था केली आहे. भारतीय बैठक, खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. चारचाकी व दुचाकी गाड्यांच्या पार्किंगसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. गेली चार वर्षे हा महोत्सव गर्दी खेचणारा आहे. यंदा हा विक्रम अबाधित राहील, असा विश्वास व्यक्त होत आहे.
कीर्तन महोत्सव आजपासून रंगणार
By admin | Updated: January 1, 2015 00:17 IST