सावंतवाडी : भविष्यात कबड्डी खेळासाठी चांगल्या सुविधा देणार असून, विद्यार्थ्यांनी कबड्डी स्पर्धेत सहभागी होऊन चांगली गुणवत्ता निर्माण करावी व प्रसिद्ध कबड्डी खेळाडू सागर बांदेकर यांच्यासारखा नावलौकिक करावा, असे प्रतिपादन सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले. जयशंभो कला-क्रीडा मंडळ व छत्रपती वाचनालय, माजगाव आयोजित सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय भव्य शालेय कबड्डी स्पर्धेचा प्रारंभ सोमवारी सकाळी राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शिवसेना तालुकाध्यक्ष रुपेश राऊळ, प्रकाश परब, वेंगुर्ले नगर परिषदेचे माजी नगरसेवक तुषार सापळे, अशोक दळवी, सल्लागार शिवराज सावंत, सुरेश सावंत, सचिव शिवराज परब, खजिनदार गौरेश सावंत, उपाध्यक्ष विनोद तळेकर, राकेश सावंत, रघुनाथ परब, संतोष सावंत, आदी उपस्थित होते. यानंतर राज्यमंत्री केसरकर म्हणाले, कबड्डी खेळ हा भारतीय खेळ आहे. सध्या मातीच्या मैदानावर घेण्यात येणाऱ्या स्पर्धा भविष्यात मॅटवर घेण्यात येणार आहेत. यामुळे कबड्डी खेळाला जिल्ह्यात चांगले दिवस येतील, असे केसरकर यांनी सांगितले. रुपेश राऊळ यांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. जयशंभो कला क्रीडा मंडळ व छत्रपती वाचनालय, माजगाव आयोजित स्पर्धेत जिल्ह्यातील बहुतांश शाळांनी कबड्डी स्पर्धेसाठी सहभाग नोंदवत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रात्री उशिरापर्यंत ही स्पर्धा सुरू होती.(वार्ताहर)
भविष्यात जिल्ह्यातील कबड्डीला वेगळे स्थान
By admin | Updated: January 8, 2015 00:00 IST