देवगड : शेतकऱ्यांचे हित जोपासून सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने नवनवीन योजना अमलात आणल्या आहेत. शेतकऱ्यांना सधन बनवण्यासाठीच बँक काम करत राहणार आहे. यासाठी विकास सोसायट्यांनाही बळकटी निर्माण करणे महत्त्वाचे आहे. त्या दृष्टिकोनातूनही बँकेच्या योजना असून, भविष्यात सिंधुदुर्गातील प्रत्येक विकास सोसायटीचा विकास साधून सिंधुदुर्गातील शेतकरी हा महाराष्ट्रातील श्रीमंत शेतकरी म्हणून ओळखला जाईल, असा विश्वास सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी देवगड येथे व्यक्त केला.देवगड तालुक्यातील सहकारी संस्थांच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष सतीश सावंत व उपाध्यक्ष सुरेश दळवी यांचा देवगड शाखेच्या सभागृहात सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.यावेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुरेश दळवी, संचालक अॅड. अविनाश माणगावकर, माजी आमदार अॅड. अजित गोगटे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नंदकुमार घाटे, जिल्हा परिषद बांधकाम सभापती संजय बोंबडी, सभापती डॉ. मनोज सारंग, उपसभापती स्मिता राणे, काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रकाश राणे, खरेदी - विक्री संघाचे चेअरमन अॅड. प्रकाश बोडस, देवगड बहुउद्देशीय सहकारी संस्थेचे अध्यक्ष उल्हास मणचेकर, कृषी उत्पन्न समितीचे माजी सभापती संभाजी साटम आदी उपस्थित होते.सतीश सावंत म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने नियोजनबद्ध व शेतकऱ्यांच्या समस्या जाणून अभ्यासपूर्ण अशा योजना तयार केल्या आहेत. या सर्व योजना शेतकऱ्यांचे हित जोपासणाऱ्या असून, या योजनांचा प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी लाभ घेतला पाहिजे. तसेच शेतकरी, आंबा बागायतदार व मच्छीमार सध्या अडचणीत असल्याने बँकेमार्फत त्यांची विशेष बैठक बोलावून चर्चा करून ठोस निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.शेतकऱ्यांसाठी विमा योजना बनवण्याचा बँकेचा मानस असून, लवकरच विमा कंपनीशी करार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून देणार असल्याचे सावंत यांनी सांगितले.सुरेश दळवी म्हणाले, विकास सोसायट्या याच जिल्हा बँकेचा पाया असून, हा पाया मजबूत करणे गरजेचे आहे. पाया मजबूत झाल्यास जिल्हा बँकही सक्षम होईल असे मत व्यक्त केले.यावेळी अॅड. अजित गोगटे, अॅड. प्रकाश बोडस, प्रकाश राणे, एम. के. सारंग यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक अॅड. अविनाश माणगांवकर, आभार तालुका इन्स्पेक्टर सतीश ढोलम यांनी मानले. यावेळी तालुक्यातील विविध सहकारी संस्थांचे अध्यक्ष, सचिव, व्यवस्थापक उपस्थित होते. (प्रतिनिधी)
शेतकऱ्यांसाठी नवीन योजना आणणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2015 00:12 IST