रत्नागिरी : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दोन्ही नव्या इमारती सज्ज झाल्या असून, काही कार्यालये आता या इमारतीत स्थलांतरित होऊ लागली आहेत. विशेष म्हणजे वर्षानुवर्षे भाड्याच्या जागेत असणाऱ्या जिल्हा माहिती कार्यालयाला ६३ वर्षांनंतर आता हक्काची जागा मिळाली आहे. गुरुवारपासून हे कार्यालय या नव्या इमारतीत आले आहे. गत वर्षी या दोन्ही इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले आहे. १५ आॅगस्ट २०१३ रोजी या इमारतींचे उद्घाटन होणार असे म्हटले जात होते. या नव्या दोन इमारतीत कोणकोणती कार्यालये ठेवावी, यांचे वाटपही झाले आहे. या दोन्ही बिल्डींगपैकी प्रत्येक मजल्यावर चार ब्लॉक आहेत. ‘ए’ बिल्डींगमध्ये एकूण १२ ब्लॉकमध्ये १६ कार्यालये ठेवण्यात येणार आहेत. ‘बी’ इमारतीत १२ ब्लॉकमध्ये १५ कार्यालये आहेत. सर्व कार्यालयांचा कारभार या दोन इमारतींमुळे एकछत्री होणार आहे.सार्वजनिक बांधकाम विभाग अंदाजपत्रक तयार करताना त्यात वीज आणि पाणीपुरवठा या दोन मुख्य गोष्टीच नमूद करायला विसरले. त्यामुळे या दोन्ही इमारती तयार होऊनही त्यात कार्यालये स्थलांतरीत झाली नव्हती.गेल्या वर्षी केवळ महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे कार्यालय या नव्या इमारतीत आले. मात्र, या दोन्ही इमारतीत विद्युत पुरवठा आणि पाण्याची काहीच सुविधा उपलब्ध नसल्याने या कार्यालयाला अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अखेर या बाबत रत्नागिरीचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी नेहमीप्रमाणे सकारात्मक भुमिका घेत बांधकाम विभागाच्या चुका दुरूस्त करून पाणी व विजेचा प्रश्न मार्गी लावला आहे.त्यामुळे आता पहिल्या इमारतीत पर्यटन विकास महामंडळापाठोपाठ जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय पहिल्या मजल्यावर आले आहे, तर गुरूवारपासून जिल्हा माहिती कार्यालयानेही या नव्या इमारतीच्या तळमजल्यावर आपल्या नियोजित जागेत पदार्पण केले आहे.सध्या या इमारतींचा विजेचा प्रश्न सुटला असला तरी पाण्याचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे. मात्र, लगतच बोअरवेल खोदण्यात आली असून, तिथून या सर्व कार्यालयांना दोन - तीन दिवसांत पाणीपुरवठा सुरू होणार आहे. काही कार्यालयांना या इमारतीत स्थलांतरीत होण्यासाठी, तसेच फर्निचर आदी खर्चासाठी निधी मंजूर झाला नसल्याने त्यांचे स्थलांतर लांबणार असल्याचे मत काहीनी व्यक्त केले आहे. (प्रतिनिधी)
माहिती कार्यालय ६३ वर्षांनी हक्काच्या जागेत...
By admin | Updated: March 1, 2015 23:14 IST