कुडाळ : कुडाळ एमआयडीसी येथील प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्याकरिता राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई २८ डिसेंबर रोजी तर जिल्ह्यातील आरोग्यसेवेसंदर्भात पाहणी करण्यासाठी आरोग्यमंत्री दीपक सावंत २ जानेवारीला जिल्ह्यात येत असल्याची माहिती वैभव नाईक यांनी कुडाळातील पत्रकार परिषदेत दिली. कुडाळ येथील एमआयडीसी बंदावस्थेत असून येथील उद्योगांना पुनर्जीवित करण्यासाठी उद्योगमंत्री देसाई यांच्याशी चर्चा झाली असून जिल्ह्यातील उद्योगधंदे वाढण्याकरिता विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठीच उद्योगमंत्री सुभाष देसाई जिल्ह्यात येत आहेत. तसेच चिपी विमानतळाच्या बाजूला रिंगरोड होण्याची शेतकऱ्यांची मागणी असून त्यासंदर्भातही उद्योगमंत्री चर्चा करणार आहेत. तसेच येथील आरोग्य यंत्रणेच्या कारभाराची पाहणी करण्यासाठी व उपाययोजना करण्यासंदर्भात आरोग्यमंत्री दीपक सावंत येत आहेत. कुडाळात ब्लड स्टोअरेज युनिट व येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदेही तत्काळ भरण्यात येणार असल्याची माहिती नाईक यांनी यावेळी दिली. तसेच अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारही लवकरच जिल्ह्यात येणार असल्याची माहिती नाईक यांनी दिली. (प्रतिनिधी)
सुभाष देसाई २८ रोजी सिंधुदुर्गात वैभव नाईक यांची माहिती
By admin | Updated: December 26, 2014 00:19 IST