कोल्हापूर : महाराष्ट्रातील नाट्य, चित्रपट परंपरा ज्यांनी नेटाने पुढे नेली, त्या कलावंतांनी दिलेल्या योगदानाचे स्मरण ठेवले गेले पाहिजे. ज्येष्ठ दिग्दर्शक अनंत माने यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांनी केलेल्या कार्याची राज्य शासनाच्यावतीने योग्य ती दखल घेतली जाईल, असे आश्वासन सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांनी दिले. शिवाजी विद्यापीठाच्या अतिथिगृहामध्ये शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, ज्येष्ठ दिग्दर्शक अनंत माने यांच्या जन्मशताब्दीनिमित्त कोल्हापूरकरांचे काही प्रस्ताव असतील तर ते द्यावेत. राज्य शासनाच्यावतीने त्यांची योग्य ती दखल घेतली जाईल. दिग्दर्शक अनंत माने यांच्या जन्मशताब्दीला सप्टेंबर महिन्यात प्रारंभ झाला. मात्र, ‘लोकमत’मध्ये अनंत माने यांच्या जन्मशताब्दीनिमित्त २२ ते २९ मार्चदरम्यान त्यांनी निर्माण केलेले चित्रपट आणि चित्रपटसृष्टीसाठी दिलेल्या योगदानासंबंधी सविस्तर मालिका ‘अनंत आठवणी’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध करण्यात आली होती. ‘लोकमत’च्या या वृत्तमालिकेची मंत्री तावडे यांनी दखल घेतली. ‘सांगत्ये ऐका,’ ‘केला इशारा जाता जाता’ अशा गाजलेल्या चित्रपटांची निर्मिती करीत कोल्हापूरची चित्रपटसृष्टी जगविण्याचे काम अनंत माने यांनी केले. आपल्या हयातीत त्यांनी ६८ हून अधिक चित्रपटांचे दिग्दर्शन केले. त्यांच्या चित्रपटांना दोनवेळा राष्ट्रीय पुरस्कार व राज्य शासनाच्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले. कोल्हापूर चित्रनगरीच्या स्थापनेसाठीही त्यांनी स्वत:ला झोकून दिले होते. मराठी चित्रपटसृष्टीतील कलावंत व तंत्रज्ञांना मानधन सुरू करण्यातही त्यांचा मोलाचा वाटा होता. मात्र, त्यांच्या हयातीत ‘ग्रामीण आणि तमाशाप्रधान चित्रपटांचा दिग्दर्शक’ अशी त्यांची अवहेलना करण्यात आली. एवढ्या मोठ्या कलावंताने चित्रपटसृष्टीत दिलेल्या योगदानाची दखल घ्यावी, असे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाला, कोल्हापूर महापालिकेला व नागरिकांनाही वाटले नाही. त्यामुळेच ‘लोकमत’मध्ये अनंत माने यांनी चित्रपटसृष्टीला दिलेल्या योगदानाची माहिती देणारी मालिका प्रसिद्ध करण्यात आली. नागरिकांकडून या मालिकेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. (प्रतिनिधी)
अनंत मानेंच्या जन्मशताब्दीची दखल
By admin | Updated: April 25, 2015 00:45 IST