सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील शेतकरी, बागायतदार व दुग्ध व्यावसायिकांना, पशुपालकांना, सुशिक्षित बेरोजगारांना कृषी व पशुपालनाविषयी आधुनिक तंत्रज्ञान, विकसीत यंत्रसामुग्री यांचे ज्ञान मिळावे तसेच जलव्यवस्थापन व यांत्रिकीकरणाचे महत्त्व कळावे तसेच कृषी व पशुसंवर्धनविषयक व्यवसायासाठी प्रवृत्त करून रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सिंधु कृषी पशु- २०१५चे आयोजन करण्यात येत आहे. या योजनेचा फायदा जिल्ह्यातील ५ हजार लाभार्थ्यांना होणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्यावतीने १४ ते १७ मार्च या कालावधीत कुडाळ येथे राज्यस्तरीय कृषी औद्योगिक पशुपक्षी प्रदर्शन व जत्रा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत व उपाध्यक्ष रणजीत देसाई यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.जिल्ह्यात दुग्धोत्पादनात वाढ व्हावी यासाठी यावर्षीपासून जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत अनेक योजना सुरू करण्यात आल्या आहेत. यामध्ये ४० टक्के अनुदानावर पुरविण्यात येणाऱ्या दुधाळ जनावरांच्या खरेदीसाठी लाभार्थ्यांना जिल्ह्याबाहेर खूप दूर जाऊन जनावरांची खरेदी करावी लागते. या प्रदर्शन कालावधीत विविध प्रकारच्या जाती व चांगली उत्पादनक्षम दुधाळ जनावरे विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यामुळे खर्चात बचत होणार आहे. या मेळाव्यामध्ये विविध चर्चासत्रे आयोजित करण्यात आली असून यामध्ये तज्ज्ञांमार्फत ऊस लागवड, मुक्त गोठा संकल्पना, दुग्ध व्यवसाय अशा अनेक विषयांवर चर्चा होणार आहे. तसेच बैलगाडी सजावट स्पर्धा, सुदृढ गाय, वासरू, बैल स्पर्धा, डॉग शो चे आयोजन करण्यात आले आहे. चार दिवस चालणाऱ्या मेळाव्यामध्ये स्थानिक लोककलांचे सादरीकरण करण्यात येणार असून आंबा महोत्सव, तांदूळ महोत्सव व जिल्हा परिषदेच्या विविध विभागांच्या योजनांची स्वतंत्र दालने उभारण्यात येणार आहेत. याद्वारे सर्व विभागांच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहेत, अशी माहिती संदेश सावंत व रणजीत देसाई यांनी दिली. (प्रतिनिधी)१५0 स्टॉलची होणार उभारणीया जत्रेमध्ये सुमारे १५० कृषी व पशुसंवर्धन विभागाशी निगडीत स्टॉल सहभागी होणार असून यामध्ये प्रामुख्याने सेंद्रीय पिके, खते, औषधे, बि-बियाणे, आधुनिक व पारंपरिक अवजारे, यंत्रसामुग्री, ट्रॅक्टर्स, सिंचन साधने, फलोत्पादन, बायोटेक्नॉलॉजी, सौरऊर्जा, पशुखाद्य व औषधे, डेअरी व पोल्ट्री व्यवसायाशी निगडीत साहित्य, कृषी व पशुसंवर्धनविषयक पुस्तके, कृषी अर्थसहाय्य, मत्स्यपालन, शेळीपालन, ससेपालन, पणन नारळबोर्ड यांचा समावेश असणार आहे. याबरोबरच राज्यातील विविध नामांकीत कंपनी आपल्या स्टॉलद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.सिंधुदुर्ग जिल्हा बँक व इतर बँकांच्या सहकार्याने या प्रदर्शनाच्या कालावधीमध्ये खरेदी करण्यात येणारी यंत्रसामुग्री व जनावरांकरीता तत्काळ कर्ज मंजूर करण्यात येणार आहे. तसेच विमा कंपन्यांच्या माध्यमातून जनावरांच्या विमा रकमेतही सूट दिली जाणार आहे.- रणजीत देसाई, जिल्हा परिषद उपाध्यक्ष
कुडाळात ‘सिंधु कृषी पशु २0१५’
By admin | Updated: February 25, 2015 00:06 IST