आचरा : स्वतंत्र भारतात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाची या देशावर निष्ठा असून १५ आॅगस्ट व २६ जानेवारी आदी दिवशी होणारे ध्वजारोहण प्रत्येक भारतीयाच्या देशाप्रती असणाऱ्या अस्मितेचे प्रतिक असल्याने आचरा गावचे प्रथम नागरिक या नात्याने आचरा सरपंच यांनी ध्वजारोहणावर घातलेल्या बहिष्काराचा इनामदार श्रीदेव रामेश्वर संस्थानकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. १५ आॅगस्ट रोजी होणाऱ्या ध्वजारोहणावर बहिष्कार घालून आंदोलन छेडणाऱ्या आचरा सरपंचांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग व जिल्हा पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांच्याकडे संस्थानच्यावतीने करण्यात आली आहे. यासंबंधी संस्थानचे अध्यक्ष मिलिंद मिराशी, खजिनदार सुधीर सुखटणकर यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी अमित भंडारी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. आचरा गावातील समस्यांचे निराकरण सनदशीर मार्गाने करण्याऐवजी ध्वजरोहणास विरोध करणे, कायदा आपल्या हातामध्ये घेणे, १५ आॅगस्टसारख्या राष्ट्रप्रेम जागृत करणाऱ्या दिवशी रस्त्यावर उतरणे या सर्व प्रकारांचे कोणत्याही स्वरुपाचे समर्थन इनामदार श्रीदेव रामेश्वर संस्थान करीत नसून आचरा गावचे प्रथम नागरिक या नात्याने मंगेश टेमकर यांना स्वातंत्र्यदिनाचे कोणतेही औचित्य वा या प्रसंगाचे गांभीर्य उरलेले नसून ज्या स्वातंत्र्यवीरांनी भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. अशाच स्वातंत्र्य संग्राममध्ये हुतात्मा पत्करलेल्या हुतात्मा दत्ताराम भाऊ कोयंडे यांच्या स्मारकापासून १० मीटर अंतराच्या आतच हे आचरा सरपंच आपला बियरबार व परमीट रुम चालवत असून या बियरबार व परमीट रुममध्ये येणारी हौशी गौशी गिऱ्हाईके आपल्याजवळील दारुच्या बाटल्या हुतात्मा स्मारकाच्या परिसरात फेकून या परिसराचे पावित्र्य भंग करण्याचा प्रयत्न करत आहेत. हुतात्मा स्मारकासारख्या पवित्र वास्तूचे महत्त्व त्या सरपंच महाशयांना कळले नाही. त्यांनीच इतर गावातील लोकांना चिथावले व स्वातंत्र्यदिनासारख्या दिवशी आंदोलन करण्यास भाग पाडणे ही गोष्ट अत्यंत दुर्दैवी असून आचरा सरपंच आपल्या पदाचा व राजकीय बळाचा गैरवापर करुन समाजामध्ये असंतोष पसरवत आहेत. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक व महाराष्ट्र शासनाने याची गंभीर दखल घेवून स्वातंत्र्यदिनास गालबोट लावण्याचा गैरप्रकारास वेळीच रोखणे गरजेचे आहे. तसेच या आंदोलनास चिथवणी देणाऱ्या अन्य लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करावी. तसे न केल्यास गावामध्ये गंभीर स्वरुपाची अशांतता माजू शकते. याकरिता आचरा सरपंच मंगेश टेकर यांना तत्काळ ताब्यात घेवून स्वातंत्र्यदिन सुव्यवस्थित पार पाडण्याची हमी घेण्यात यावी अशी मागणी रामेश्वर संस्थानचे विश्वस्तांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांच्याकडे केली आहे. गावातील अन्य ग्रामस्थ देखील आंदोलन करणाऱ्यांना नेमका महत्त्वाचा हाच दिवस का मिळतो. अन्य दिवशी आंदोलन घेवू शकत नाही का असा खडा सवाल करत आहेत. तसेच आपल्या प्रश्नांची उकल सनदशीर मार्गाने करुन घेणे आवश्यक असल्याचे बोलत आहेत. (वार्ताहर)
स्वातंत्र्यदिनी बहिष्कार निषेधार्ह
By admin | Updated: July 19, 2015 00:30 IST