सावंतवाडी : शहरातील मसूरकर ज्वेलर्समधून चोरी करून पसार झालेल्या महिलांच्या सूत्रधाराला पोलिसांनी बीड देवराई येथून ताब्यात घेतले. त्यावेळी त्या चौघी महिलाही सोबत होत्या. पण स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी मोबाईल लोकेशन वरून नितीन पोपटघट यालाच ताब्यात घेतल्याने त्यावेळी अन्य आरोपी पसार झाले. त्यामुळे पोलिसाच्या हाती आलेले आयते सावज निष्क्रीयतेमुळे सुटले. शहरातील मसूरकर ज्वेलर्समध्ये साडे सात लाखाची चोरी करून चार महिला पसार झाल्या होत्या. या महिलांनी सावंतवाडीत चोरी केली. त्यापूर्वी कणकवलीतील एका दुकानाचीही पाहणी केली. पण त्यांना यश आले नाही. अखेर सावंतवाडीतील मसूरकर ज्वेलर्समध्ये वर ठेवलेली सोन्याची पुडी त्यांनी अलगद उचलून नेली. यात साडेसात लाख रूपयांचे दागिने होते. ज्यावेळी या महिलांनी दुकानात प्रवेश केला. त्यावेळी त्या महिला वेगळ्या रिक्षातून आल्या होत्या. तसेच जातानाही त्यांनी दोन रिक्षा बदलत शिरोड्या नाक्यावरून गाडी पकडली. त्यामुळे पोलिसांनाही तपास करताना थोडसे अडचणीचे गेले. तरिही स्थानिक पोलीस व स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या अधिकार्यांनी या तपासाचा छडा लावला. या महिला दोन पुरूषांसमवेत स्वीफ्ट कारने आल्या होत्या. त्यांनी कणकवलीत पहिल्यांदा जाऊन बेलवलकर यांच्या दुकानात चोरीचा प्रयत्न केला. त्यात यश आले नाही म्हणून त्या महिला सावंतवाडीत आल्या. यावेळी त्या महिलांचा सतत एका मोबाईल धारकाशी संपर्क सुरू होता. त्यावरूनच पोलिसांनी बीड देवराईमधून नितीन पोपटघट याला ताब्यात घेतले. मात्र, नितीन याला ताब्यात घेत असतानाच देवराईमधील घरी महिलेसह नितीन हा चर्चा करीत बसला होता. त्यावेळीच स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. पण त्या महिलांची पोलिसांनी चौकशी केली नाही. त्यामुळे पोलिसांच्या हाती आलेले सावज सुटले. पोलिसांच्या या निष्क्रीयतेची चर्चा आता सावंतवाडी शहरात सुरू आहे. याबाबत चोरी प्रकरणातील आरोपी नितीन याला विचारले असता, त्यानेही आपण चर्चा करीत बसल्याचे मान्य केले. मात्र, एका पोलीस अधिकार्याला विचारले असता याबाबत माहिती नसल्याचे सांगितले. दरम्यान, हे आरोपी पकडले असते तर सावंतवाडी शहरातील मसूरकर ज्वेलर्समधील चोरीप्रकरणाचा तपास संपला असता. तसेच सिंधुदुर्ग पोलिसांची मान ताठ राहिली असती. यातील कावेरी ही महिला बीडमधील तर अन्य महिला परभणी, गंगाखेड येथील असून या महिलांवर अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचे पुढे येत आहे. या महिलांना पकडण्यासाठी सावंतवाडी पोलीस स्थानिक पोलिसांची मदत घेणार आहेत. तसेच आरोपीची मालमत्ता सील करण्यात यावी, यासाठी न्यायालयाकडे मागणी करणार आहेत. (प्रतिनिधी)
पोलिसांची निष्क्रीयता; आरोपी फरार
By admin | Updated: May 16, 2014 00:20 IST