नांदगांव : तालुक्यातील कासार्डे साटमवाडीतील एकत्रित राणे कुटुंबातील गोकुळाष्टमीला सुमारे दोनशे वर्षांचा इतिहास आहे. विशेष म्हणजे यानिमित्त खेळण्यात येणाऱ्या आगळ्यावेगळ्या खेळात अनेकांचे कसब लागते. गेल्या दोनशे वर्षांपासून आगळ्या वेगळ्या पद्धतीने अत्यंत धार्मिक वातावरणात अखंडीत गोपाळकाला व गोकुळाष्टमी साजरी केली जात असल्याचे राणे कुटुंबियांकडून सांगण्यात आले. यात राणे कुटुंबियांसह गावातील अनेकजण सहभागी होतात आणि गोपाळकाल्याचा आनंद लुटतात.राणे कुटुंबियांकडून सांगण्यात आले की, राणे कुटुंबातील राजबा राणे या मूळ पुरुषाने सुमारे दोनशे वर्षांपूर्वी या उत्सवाला सुरुवात केली. त्यापासून आजतागायत अव्याहतपणे हा उत्सव मोठ्या धार्मिक वातावरणात साजरा होत आहे. गोकुळाष्टमीच्या दिवशी सकाळी बाळकृष्ण आणि संपूर्ण गोकुळ कासार्डे साटमवाडी येथील राणे यांच्या मूळ घरात सवाद्य आणले जाते. त्यानंतर विधीवत पूजा करून रात्री १२ वाजता पाळण्यात घातले जाते आणि जन्माष्टमी साजरी केली जाते. श्रावण महिन्यातील धार्मिक ग्रंथवाचन, भजन, नवस बोलणे व फेडणे, प्रसाद वाटप व त्यानंतर महिलांच्या फुगड्यांचा कार्यक्रम रंगत जातो. यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित असतात.गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी गोपाळकाल्याला दुपारी सुरुवात होते. यावेळी खेळला जाणारा दहीहंडी हा उत्सव अनेकांचे आकर्षण असते. कृष्णाच्या मूर्तीसमोर हंडी सजवली जाते. यावेळीही अनेकजण नवस बोलतात. राणे कुटुंबाच्या मूळ घराच्या अंगणात सहा फूट अंतराने दोन खांब पुरतात. त्याभोवती रांगोळी घालून ढोलताशांच्या गजरात खांबाभोवती रिंगण करून भजन म्हटले जाते.यावेळी वातावरण संपूर्ण धार्मिक बनलेले असते. यावेळी असंख्य भाविक उपस्थित असतात. यानंतर खऱ्या अर्थाने आगळीवेगळी दहीहंडी साजरी होते. दरवर्षी हा खेळ आणि दहीहंडी पहायला असंख्य भाविक उपस्थित असतात.इतरवेळेप्रमाणे मानवी मनोरा न करता उपस्थित ज्येष्ठ व्यक्तीला वर उडविले जाते. त्याच्या हातात असलेल्या सुरीने हंडी फोडायची. जोपर्यंत हंडी फुटत नाही तोपर्यंत त्याला वरती उडविले जाते आणि खालचे सर्वजण त्याला झेलतात. त्यानंतर अनेकांचे कसब पणाला लावणारा खेळ खेळला जातो. उपस्थित काहीजण त्या खांबाभोवती अक्षरश: झोपून खांब घट्ट पकडतात तर काहीजण तो खांब काढण्याचा प्रयत्न करतात. यावेळीही खूप मजा येते. दोन्हीही गट आपली ताकद लावत असतात. हा खेळ दोन तास चालतो. अशा खेळाद्वारे हंडीसाठी उभारलेले दोन्हीही खांब काढल्यानंतर श्रीकृष्णाचे विसर्जन होते. (वार्ताहर)दोनशे वर्षांचा इतिहासशहरी भागासह ग्रामीण भागातही दहिहंड्यांमध्ये स्पर्धा निर्माण होत असतानाच कासार्डेसारख्या गावात अशाप्रकारचा आगळावेगळा गोपाळकाला अखंडपणे साजरा केला जात आहे. सुमारे दोनशे वर्षांचा इतिहास असलेला हा सण मोठ्या आनंदात व उत्साहात पार पाडण्यासाठी राणे कुटुंब सहभागी होत असते.
कासार्डेतील ऐतिहासिक गोकुळाष्टमी
By admin | Updated: September 7, 2015 23:25 IST