खेड : उच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निर्णयाचा मान राखीत खेडच्या हिंदुराज मित्रमंडळाने यावर्षी दहीहंडी न बांधण्याचा निर्णय घेतला आहे़ याच पैशांतून तालुक्यातील भाविकांना तीर्थयात्रा घडवून आणण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही या मंडळाने घेतला असून, अनेक दहीहंडी उत्सव मंडळांना आदर्श घालून दिला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाचा मान राखण्याच्या दृष्टीनेच हे पाऊल आपण उचलले असल्याचे मंडळाचे अध्यक्ष सुनील शिंदे यांनी सागितले़ मुंबईत दहीहंडीच्या सरावादरम्यान दोन बालकांचा पडून मृत्यू झाला. त्याची दखल उच्च न्यायालयाने घेतली असून, यावर्षी दहीहंडीवर निर्बंध आणले आहेत. उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे राज्यातील काही मंडळांनी दहीहंडी उत्सवच रद्द केला आहे तर काही मंडळांनी न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून हा उत्सव साजरा करण्याचे ठरवले आहे. यंदा प्रथमच या उत्सवावर पोलिसांची करडी नजर राहणार आहे.दरम्यान, केवळ निर्बंधांच्या अधीन राहून नव्हे; तर सामाजिक भान राखत हिंदुराज मित्रमंडळाने समाजासमोर आदर्श ठेवणारा निर्णय घेतला आहे. उच्च न्यायालयाने निर्बंध आणल्याने खेडमधील हिंदुराज मित्रमंडळाने हा उत्सवच बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या उत्सवासाठी येणारा खर्च सामाजिक उपक्रमासाठी खर्ची घालण्याचे मंडळाने ठरवले असल्याचे शिंदे यांनी सांगितले. गरीब भाविकांना तीर्थयात्रा करण्यासाठी आर्थिक मदत या खर्चातून केली जाणार आहे.खेडमध्ये गेली अनेक वर्षे ंिहंदुराज मित्रमंडळ सांस्कृतिक आणि सामाजिक तसेच शैक्षणिक क्षेत्रातही कार्यरत आहे़ या मंडळाच्या विविध उपक्रमांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे़ (प्रतिनिधी)
हिंदुराज मित्रमंडळाने दहीहंडी केली रद्द
By admin | Updated: August 12, 2014 23:23 IST