साटेली भेडशी : साटेली-भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णांना भरदिवसा केंद्राच्या ‘बंद दरवाजा’चा सामना करावा लागत आहे. विशेषत: ज्या गंभीर रुग्णांना रिक्षा अथवा चारचाकी वाहनांतून आणले जाते, त्यांना दरवाजा उघडेपर्यंत तिष्ठत रहावे लागत असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांबरोबरच त्यांच्या नातेवाईकांनाही विचित्र प्रसंगाना सामोरे जावे लागत असल्याने आरोग्य केंद्र व्यवस्थापनाने व जिल्हा परिषदेच्या संबंधित लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी अचानकपणे रुग्णालयाचे प्रवेशद्वार बंद ठेवण्याचा हा निर्णय तत्काळ बदलावा, अशी मागणी होत आहे. जवळपास निम्मा तालुका साटेली-भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्रावर अवलंबून असून तालुक्यातील सर्वाधिक आंतरबाह्य रुग्णसंख्या असलेले हे केंद्र आहे. बहुतेकवेळा वाहनानेच रुग्णांना आणले जाते. गंभीर रुग्णांसाठी एक-एक सेकंदही महत्त्वाचा असतो. पण अलिकडे केंद्रासमोरील मुख्य गेट दिवसभर बंद ठेवण्यात येत असल्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची गैरसोय होत आहे. याशिवाय हे प्राथमिक आरोग्य केंद्र अनेक समस्यांनी ग्रासलेले आहे. (वार्ताहर)रूग्ण कल्याण समितीचा उपयोग काय ?केंद्राच्या आवारातील निकृष्ट दर्जाच्या बांधकामाबात लक्ष देण्याची वेळोवेळी मागणी करूनही रुग्ण कल्याण समिती मूग गिळून गप्प राहिली. त्यातच आता ‘गेट बंद’चा हा निर्णय रुग्णांना त्रासदायक ठरत आहे. तरीही रुग्ण कल्याण समिती गप्प आहे. रुग्णांच्या कल्याणासाठी गठीत केलेली समिती या प्रकारांकडे गांभीर्याने पाहत नसेल, तर तिची गरज काय? असा प्रश्न जनतेतून उपस्थित केला जात आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी, आरोग्य सभापती यांनी बंद दरवाजाचा हा निर्णय तत्काळ बदलण्यास भाग पाडावे, असे आवाहन जनतेने केले आहे.
आरोग्य केंद्राचा ‘बंद दरवाजा’
By admin | Updated: November 12, 2014 22:50 IST