मालवण : देवबाग-मोबारवाडी येथील सुधाकर जगन्नाथ सामंत यांच्या अनधिकृत बांधकामावर महसूल प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला. सोमवारी सकाळी सहा वाजता तहसीलदार वनिता पाटील यांनी प्रचंड पोलीस बंदोबस्त, जेसीबीच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली. सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करून बेकायदेशीररित्या बांधकाम केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. अनेक अनधिकृत बांधकामांना महसूलकडून सीआरझेडच्या नोटीसा असल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, कारवाईच्या ठिकाणी अटकाव करण्यासाठी ग्रामस्थ दाखल झाले होते. मात्र पोलिसांनी एका ग्रामस्थाला ताब्यात घेतल्याने अन्य ग्रामस्थ अटकाव करण्यासाठी पुढेच आले नसल्याचे चित्र होते. देवबाग येथील सुधाकर सामंत यांचे अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी महसूल प्रशासनाने जय्यत तयारी केलेली होती. पहाटे साडे पाच वाजता पोलीस आणि महसूलचे अधिकारी, तलाठी, कर्मचारी यांना बोलावण्यात आले होते. त्यानुसार मालवण आणि आचरा पोलीस ठाण्याचे सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी तहसील कार्यालयात हजर झाले. त्यांनतर साडे सहाच्या सुमारास तहसीलदार वनिता पाटील या प्रचंड पोलिस बंदोबस्त, जेसीबी घेऊन देवबाग येथे जाण्यास रवाना झाल्या. यावेळी नायब तहसीलदार जी. के. सावंत, निवासी तहसीलदार खडपकर, पोलिस निरीक्षक शंकर पाटील, आचरा पोलिस निरीक्षक महेंद्र शिंदे यासह दोन्ही पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी, मंडळ अधिकारी, तलाठी निघाले. कोणते बांधकाम तोडण्यात येणार आहे याची एकाही पोलीस अधिकाऱ्याला कल्पना देण्यात आली नव्हती. सातच्या सुमारास देवबाग मोबारवाडी येथील सामंत यांच्या जागेत असलेले घराचे बांधकाम तोडण्यास सुरुवात करण्यात आली. यावेळी सदा तांडेल यांनी अधिकाऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी तांडेल यांना ताब्यात घेतले. त्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने चिरेबंदी असलेले हे बांधकाम तासभरात जमीनदोस्त केले. या कारवाईबाबत गुप्तता पाळण्यात आली होती. (प्रतिनिधी)
अनधिकृत बांधकामावर हातोडा
By admin | Updated: December 15, 2015 00:31 IST