खेड : तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष गणपत चिकणे यांनी आपल्या पदाचा आणि पक्षाचा राजीनामा दिला आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी तो स्वीकारल्याचे सांगण्यात आले आहे़ चिकणे यांच्या राजीनाम्यामुळे जुना जाणता आणि निष्ठावान कार्यकर्ता पक्ष सोडून गेल्याविषयी चर्चा रंगली आहे़ चिकणे आता शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्याला हिरवाकंदील मिळाल्याचे सांगण्यात येत आहे़ भास्कर जाधव प्रदेशाध्यक्ष असताना चिकणे यांची खेडच्या तालुकाध्यक्षपदी निवड केली होती. त्यांच्याच काळात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढवल्या गेल्या़ मात्र, यातील विधानसभा निवडणुकीदरम्यान चिकणे यांना विशेष असे काही स्थान मिळाले नव्हते, त्यांना परस्पर डावलण्यात आले होते. निवडणुका संपल्यानंतरही त्यांना डावलून तालुकाध्यक्षपदी संजय कदम यांचे निकटचे सहकारी स. तु. कदम यांची वर्णी लावण्यात आली़ यामुळे चिकणे हे कमालीचे नाराज झाले होते. अल्पावधीत ही नाराजी उफाळून आली आणि त्यातूनच चिकणे यांनी राजीनामा दिला. (प्रतिनिधी)
चिकणे यांचा राजीनामा तटकरेंनी स्वीकारला
By admin | Updated: December 1, 2014 00:17 IST