चिपळूण : शहरात गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याच्या बाजूला वीजखांब उभे आहेत. अरुंद रस्त्यांमुळे वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत आहे. याअनुषंगाने भुयारी वीज वाहिनीचा प्रस्ताव महावितरण कंपनीकडे पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला अखेर हिरवा सिग्नल मिळाला आहे. पुणे, मुंबईच्या धर्तीवर भुयारी वीज वाहिनीबाबतचा प्रस्ताव काँग्रेस शिष्टमंडळातर्फे उपनगराध्यक्ष लियाकत शाह यांच्या नेतृत्त्वाखाली चिपळूण महावितरण कंपनीकडे दोन वर्षांपूर्वी पाठविण्यात आला होता. भुयारी वीज वाहिनी होणे काळाची गरज आहे. या अनुषंगाने हा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. या प्रस्तावाला महावितरण कंपनीने सहमती दर्शविली आहे. शहरातील ३ किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर भुयारी वीज वाहिनी जोडण्यात येणार आहे. प्रथम शहरात भुयारी वीज वाहिनी जोडण्याबाबत प्राधान्य दिले जाणार आहे. भुयारी वीज वाहिनीमुळे पावसाळ्यात वीज वाहिन्या तुटून होणारे नुकसानही टळणार आहे. या भुयारी वाहिनीसाठी किती खर्च येईल, याबाबत सर्वे केला जाणार आहे. त्यानंतर नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे. यादृृष्टीने आता हालचालींना वेग आला आहे. (वार्ताहर)
भुयारी वीज वाहिनीला हिरवा कंदील
By admin | Updated: December 30, 2014 23:24 IST