कणकवलीचं पाणी जोखण्याचा भल्याभल्यांनी प्रयत्न केला असेल. पण अचूक जोखणारा असून जन्मायचा आहे. आजवर किती जणांनी हे पाणी खराब आहे, म्हणून सांगितले असेल. पण तरीही उकळलेल्या पाण्याची बाटली वागवत शेजाऱ्याच्या लग्नाच्या पंगतीला शोभा आणणारे कणकवलीकर अभावानेच दिसतात. याचा अर्थ कणकवली परिसरातले कुठलेही पाणी प्या तुम्ही निरोगी असाल तर निरोगीच रहाल आणि रोगी असाल तर तसेच रहाल. म्हणजेच पाण्यामुळे तुमचे काही कमी-जास्त होणार नाही. परवा एका जोडगोळीने आमच्या पाण्याची प्रत्यक्ष परीक्षा घेऊन त्यांच्यात धोकादायक क्षार असल्याने आर्जवाने सांगितले. तरीही आमची मने त्यात विरघळली नाहीत. आमचा आमच्या पाण्यावर एवढा विश्वास की जोडगोळीच्या धडपडीकडे आम्ही जादुगाराच्या खेळासारखे पाहिले आणि काही मनावर न घेता घर गाठले.त्याचे असे झाले. आमची लेक्चर्स संपली असल्याची वेळ साधून ते दोघे काखोटीला सॅक अडकवून स्टाफरूममध्ये दाखल झाले. म्हणाले,‘सर, तुमची पाचच मिनिटे घेतो.’ नेहमीप्रमाणे आमच्यातले काहीजण उठून बाहरे गेले. कारण पाचाचे पन्नास होण्याची शक्यता असतेच. आम्ही काहीजण थांबलोच. जोडगोळीपैकी एकाने प्रस्तावनेदाखल पाणी म्हणजे आपला प्राण, पाणी म्हणजे जीवन- असल्या जुन्या कवितेत शोभणाऱ्या ओळी वगैरे ऐकवल्या. आमच्या एका सहकाऱ्याने सुनावले- ‘मुद्याचं बोला.’ मग तो मुद्यावरच आला. ‘तुम्ही सायब लोक डेली लाईफमध्ये जे वॉटर पिता त्याची परीक्षा मी घेणार आहे. अर्थात तुमच्या परवानगीने आणि तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर.कारण ट्रस्ट इज इंपॉर्टन्ट ना?’ मग तो म्हणाला,‘तुम्ही पिता त्यातलं अर्धा ग्लास पाणी मिळेल का?’ त्याने असं म्हटल्यावर प्राध्यापकांच्या बॅगांतून बाटल्या (पिण्याच्या) बाहेर आल्या. (बहुतेकांना, बहुतेक पाणी परीक्षेचा प्रयोग होणार हे माहित असावे.) सर्वात आधी माझी बाटली मी पुढे केली. त्यातले पाणी ग्लासात घेऊन त्यात त्याने आपल्या हातातले लेव्हल बॉटलसारखे दिसणारे यंत्र त्यात बुडविले. बारीक डोळ््याने पाहून त्याने त्यावरील डिजिटल आकडा वाचला, ‘हे पहा १५४ आहे क्षार या पाण्यात’. मी गर्वाने म्हणालो, ‘असणारच. आमच्या विहिरीची दरवर्षी स्वच्छता करतो आम्ही. शिवाय जाळीने झाकलीय विहीर. शिवाय रेग्युलर पोटॅशियम परमँगनेटही आहेच. आमच्यासारखे शुद्ध पाणी अख्ख्या कणकवलीत नाही. अगदी मिनरल वॉटर बघा.’ असे माझे अभिमानाचे उद्गार.क्षार जास्त म्हणजे पाणी दमदार असे माझे (अ)ज्ञान! त्याने माझ्याकडे पाहिले मात्र आणि म्हणतो कसा,‘थांबा थांबा सर. तुमचं पाणी दिसायला शुद्ध आहे, पण पिण्यासाठी योग्य नाही. बघा १५४ क्षारपातळी म्हणजे काय? डेंजरसच की! किती पातळी पायजे क्षाराची? ३०च्यावर अजिबात नको. मिनरल वॉटरची तर १५ ते २० असते, माहितेय? त्यापेक्षा खाली आणली तर पाणी बेचव लागणार...’ आता काय करणार? याच्यावर विश्वास ठेवायचा का? मी शेजारच्या सरांना हळूच म्हटले- याच्या या मशिनवर विश्वास कसा ठेवायचा? त्या मशिनधारी बिलंदराने हे ऐकले. तो शांतपणे म्हणाला, ‘हे डिजिटल मशिन आहे- खरं तेच सांगणार.’दरम्यान, आणखी काही बाटल्या स्टाफरूममध्ये पोचल्या होत्या. त्याने उपस्थित बाटल्यांपैकी सर्व बाटल्यांतले पाणी तपासले. कणकवलीच्या विविध भागातले ते पाणी होते. कुणाचे ९०, कुणाचे ११२ तर कुणाचे १२३ असे क्षार पडू लागले. मंडळी थोडी भयभीत झाली. आता कसे होणार? दरम्यान, आणखी एक मशिन सॅकमधून काढत तो म्हणाला, ‘आता पाण्यातली घाण दाखवतो बघा.’ एकेका बाटलीतले पाणी घेऊन त्यावर तो मशिनचा प्रयोग करू लागला. त्या मशिनच्या धातूच्या कांड्या नुसत्या पाण्यात बुडवल्या आणि लाईटचा खटका मारला रे मारला की ग्लासातल्या पाण्याची घुसळण सुरू.अगदी नितळ पाण्यातही लाल-पिवळे धुळीचे लोट दिसू लागले. जवळच राहणाऱ्या एका सहकाऱ्याने अॅक्वागार्डमधले पाणी आणून दिले. त्यातही ‘ही... एवढी’ घाण. तो आम्हाला म्हणाला, ‘अशी ही घाण तुमच्या पोटात जाते. मूतखड्याची निर्मिती यातून होते.’ आता आम्ही पूर्ण भयभीत झालो. मग तो आधार देत म्हणाला, ‘घाबरू नका सर लोकानू. क्षाराची पातळी हवी तेवढी ठेवणारे आणि घाण व जंतू पूर्णपणे नाहिसे करणारे एक रिफ्रेश मशिन माझ्याकडे आहे. एकाची किंमत पंधरा हजार. दहा जणांनी घेतल्यास कंपनीची जाहिरात म्हणून दहा हजाराला एक.’ तो बॉक्स सोडू लागला. आणि गुप्त संगणकाची कमांड यावी तसे आमचे हात आमच्या बॅगांकडे वळले आणि पाय घरचा रस्ता धरू लागले. (लेखक इंग्रजी भाषा व साहित्याचे प्राध्यापक आहेत.)
कणकवलीचं पाणी
By admin | Updated: November 22, 2014 00:13 IST