रामचंद्र कुडाळकर / तळवडे सिंधुुदुर्ग जिल्ह्यात एकीकडे पर्यटनाच्या दृष्टीकोनातून विकास होत असताना जमिनींच्या किमतीही गगनाला भिडत आहे. परजिल्ह्यातील व्यावसायिक कंपन्या व व्यावसायिकांच्या आगमनाने गेल्या पाच वर्षात जमिनींना सोन्याचा भाव मिळत आहे. तसेच कौलारु घरांच्या जागी मोठमोठ्या बिल्डींग दिसू लागल्या आहेत. जमिनीचे वाढते दर व फ्लॅटचे दर याचा विचार करता जिल्ह्यातील सर्वसामान्य जमिनी देऊन श्रीमंत होत असला तरीही त्याच जमिनीवरील घर घेणे हे आवाक्याबाहेर गेल्याची स्थिती आहे. सावंतवाडी तालुक्यातील मळगाव, निरवडे भागाचा विचार करता या ठिकाणी असणाऱ्या मोक्याच्या जागा परजिल्ह्यातील व्यावसायिकांनी विकत घेतल्याने स्थानिकांचे जमीनदारीतील वर्चस्व कमी झाले. जिल्ह्यातील रो हाऊस, बंगल्यांचे प्रमाण वाढले आहे. रो हाऊस, बंगले, फ्लॅट यांचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य माणसाचे घराचे स्वप्न पूर्ण होणे असंभव भासू लागले आहे. निरवडे परिसरातील विचार करता, ४० टक्के घरांची संख्या वाढली आहे. या भागात मोठ्या प्रमाणात रो हाऊस, बंगले, फ्लॅट यामध्ये राहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढते आहे. ग्रामपंचायतीच्या महसुलात, शासनाच्या करात वाढ झाल्याने ग्रामपंचायतीला याचा फायदा झाला. मळगाव-निरवडे परिसराची शहरीकरणाच्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे. निरवडे गावात प्रतिगुंठा दर दीड लाखापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे रेल्वेस्थानक परिसरातील जमिनीच्या दराचा विचार करणेही कठीण बनले आहे. सावंतवाडी रेल्वेस्थानक व झाराप-पत्रादेवी चारपदरी महामार्गामुळे या ठिकाणी बिल्डरची संख्या वाढली आहे. परिसरातील बहुतांशी जमिनी उद्योगपतींनी घेतल्या आहेत. जमिनीचे योग्य भाव येत असल्याने शेतकऱ्यांनी या जमिनी उद्योगपतींना विकल्या आहेत. या ठिकाणी मोठे उद्योग येऊन स्थानिकांनाही रोजगार मिळेल, अशीही आशा व्यक्त होत आहे. त्यामुळे नोकरी ग्रामीण भागात आणि वास्तव्य शहरात, अशी एक नवीनच पद्धत सुरू होत आहे. मुंबई सारख्या शहरात नोकरी करणाऱ्या चाकरमान्यांना निसर्गरम्य, शांत परिसरात घर असावे, अशी इच्छा असते. अशा प्रकारचे पर्यटन, निसर्गरम्य, आरोग्यमय परिसर सावंतवाडी परिसरात असल्याने येथे बंगल्यांची कामे सुरू आहेत. मोठमोठ्या शहरातील श्रीमंत लोक हे बंगले खरेदी करतात. त्यामुळे याठिकाणी बांधकाम व्यवसायाला अनुकूल असेच वातावरण आहे. येथील सुरक्षिततेचे महत्त्व लक्षात घेऊन सिक्युरिटीचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
जमिनींच्या किंमतीला सोन्याचा भाव
By admin | Updated: June 22, 2014 01:42 IST