सिंधुदुर्गनगरी : सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये परिचारिका या सर्वात चांगले काम करून रूग्णांची सेवा करीत असतात. त्यामुळे परिचारिकांबद्दल आम्हाला आदर आहे. परिचारिकेचे दर्जेदार प्रशिक्षण घ्या व तरबेज नर्सेस व्हा. हसतखेळत रूग्णांची सेवा करीत सिंधुदुर्गचे नाव उज्ज्वल करा, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री नारायण राणे यांनी जी.एन.एम. परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालयाच्या नूतन इमारत उद्घाटनच्या कार्यक्रमप्रसंगी बोलताना केले.जी.एन.एम. परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालय जिल्हा मुख्यालय ओरोस येथे शनिवारपासून सुरू करण्यात आले असून त्या इमारतीचे उद्घाटन पालकमंत्री राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राणे बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्षा दीपलक्ष्मी पडते, जिल्हाधिकारी ई. रविंद्रन, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संदेश पारकर, स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नीतेश राणे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आर. डी. माने, डॉ. मिलिंद कुलकर्णी, ओरोस सरपंच मंगला ओरोसकर, डॉक्टर, परिचर्या, अधिकारी उपस्थित होते.सुरूवातीला ए.एन.एम. या परिचर्या प्रशिक्षणामध्ये गोवा व महाराष्ट्र राज्यात प्रथम व द्वितीय आलेल्या परिचारिकांना पालकमंत्र्यांच्याहस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यात वासंती काळे प्रथम, शांती कदम द्वितीय, दीपाली सावंत प्रथम, सिद्धी बांदेकर द्वितीय, पायल चव्हाण द्वितीय या परिचारिकांचा समावेश आहे. यावेळी जिल्हाधिकारी ई. रविंद्रन, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी मनोगत व्यक्त केले. इमारतीचे काम चांगले झाल्याबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता छाया नाईक यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)
परिचारिकेचे दर्जेदार प्रशिक्षण घ्या
By admin | Updated: August 17, 2014 00:21 IST