रत्नागिरी : पोलिसांच्या रखवालीतून पळून गेलेल्या अट्टल सराईत गुन्हेगाराला रत्नागिरी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या गस्त घालणाऱ्या पोलीस पथकाने मंगळवारी मध्यरात्री अटक केली. सचिन प्रमोद चाचे (२१, रा. मानखुर्द, मुंबई) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. त्याला कुवारबावजवळील रत्नागिरी रेल्वे स्टेशन फाटा येथील एस. टी. प्रवासी निवारा इमारतीजवळ लपण्याचा प्रयत्न करीत असताना पकडण्यात आले.सचिन चाचे याच्यावर चोरी, घरफोडी यांसारखे गुन्हे चिपळूण पोलीस ठाण्यात दाखल आहेत. या गुन्ह्यात तो रत्नागिरी मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत होता. त्याने यापूर्वी जिल्ह्यातील चिपळूण, खेडसह ठाणे, तुर्भे, नवी मुंबई येथे केलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने त्याला वाशी न्यायालय, नवी मुंबई येथे हजर करण्यासाठी १९ डिसेंबर २०१४ रोजी पोलीस घेऊन जात होते. त्यावेळी सचिन हा पोलिसांच्या रखवालीतून निसटून गेला होता. त्याचा मुंबई व पुणे येथे शोध सुरू होता. ३० डिसेंबर २०१४ रोजी रात्र गस्तीच्या वेळी कोणीतरी रेल्वेफाटा येथील एस. टी. निवारा शेडच्या मागे लपण्याचा प्रयत्न करीत असल्याचे लक्षात येताच संशय आल्याने पोलिसांनी त्याची तपासणी केली. त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याच्या हाताला रुमाल बांधलेला असल्याने पोलिसांना संशय आला. त्यांनी रुमाल काढला असता त्याच्या हातात बेडी असल्याचे स्पष्ट झाले. तसेच त्याच्या पाठीवर असलेल्या सॅगमध्ये घरफोडी करण्याची हत्यारे, पक्कड, चाकू, स्क्रू ड्रायव्हर यांसाख्या वस्तू आढळून आल्या. त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली. ही कामगिरी स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पोलीस निरीक्षक एस. एल. पाटील, पोलीस उपनिरीक्षक रविराज फडणीस, सहाय्यक पोलीस फौजदार मामा कदम, जमीर पटेल, पोलीस नाईक उदय वाजे, सुनील पवार, पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण बर्गे, विनोद जाधव, वैभव मोरे, संदीप मालप, पापा भोळे यांनी केली. (प्रतिनिधी)चिपळूण, खेडसह ठाणे, तुर्भे, नवी मुंबई येथे केलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने त्याला वाशी न्यायालय, नवी मुंबई येथे हजर करण्यासाठी १९ डिसेंबर रोजी पोलीस घेऊन जात असताना होता पळाला.
फरार गुन्हेगाराला रत्नागिरीत अटक
By admin | Updated: January 1, 2015 00:18 IST