सिंधुदुर्गनगरी : गेले चार महिने रखडलेले अंगणवाडी सेविकांचे वेतन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, केंद्रशासनाने सेविकांच्या वेतनातील अनुदानापोटी २ कोटी ५० लाख रुपये जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाकडे जमा केले आहेत. त्यामुळे लवकरच या अंगणवाडी सेविकांचे मानधन खात्यात जमा होणार असून, त्यांनी पुकारलेले असहकार आंदोलन मागे घ्यावे व कुपोषण मुक्तीसह इतर अहवाल वेळच्यावेळी सादर करावेत अन्यथा कारवाई केली जाईल असा इशारा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी दिला.जिल्हा परिषदेची महिला व बालविकास समितीची सभा सभापती स्नेहलता चोरगे यांच्या अध्यक्षतेखाली येथील बॅ. नाथ पै सभागृहात पार पडली. यावेळी समिती सदस्य वंदना किनळेकर, रुक्मिणी कांदळगावकर, रत्नप्रभा वळंजू, श्रावणी नाईक, समिती सचिव तसेच बालविकास अधिकारी सोमनाथ रसाळ, अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते.२९ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील हजारो अंगणवाडी सेविकांनी गेले चार महिने मानधन न मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद भवनावर मोर्चा काढला होता. याबाबतचा विषय सभागृहात चर्चेला आला असता सोमनाथ रसाळ म्हणाले की, अंगणवाडी सेविकांच्या मानधनापोटी राज्यशासनाचा हिस्सा प्राप्त झाला होता. ते अनुदान तालुकास्तरावर वितरीतही करण्यात आले होते. मात्र, केंद्रशासनाकडून निधी प्राप्त होत नव्हता. आज सकाळी केंद्राकडून अंगणवाडी सेविकांच्या मानधनासाठी २ कोटी ५० लाखांचा निधी प्राप्त झाला असून, हा निधी वितरणासाठी तत्काळ तालुकास्तरावर वितरीत करण्यात येणार आहे. त्यामुळे मानधनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. (प्रतिनिधी)
अंगणवाडी सेविकांच्या वेतनाचा मार्ग मोकळा
By admin | Updated: October 1, 2015 22:43 IST