कुडाळ : राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या भूसंपादनावेळी येथील ग्रामस्थांवर अन्याय न होता त्यांना विश्वासात घेऊनच भूसंपादन करण्यात यावे, अन्यथा लोक बेघर होऊन त्यांच्या उपजीविकेचे साधन बंद होईल. याकरिता येथील ग्रामस्थांचे म्हणणे शासन दरबारी मांडावे, अशा आशयाचे निवेदन कुडाळ प्रांताधिकाऱ्यांना पावशी सरपंच व ग्रामस्थांच्यावतीने देण्यात आले. जिल्ह्यात होणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपरीकरणाबाबत भूसंपादन प्रक्रियेला अनेक गावांतून विरोध होत आहे. अशाचप्रकारे चुकीच्या पद्धतीने व अन्यायकारक भूसंपादन प्रक्रिया होऊ नये, अशी मागणी पावशी सरपंच श्रीपाद तवटे यांनी पावशी ग्रामस्थांच्यावतीने प्रांताधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी अवाजवी भूसंपादन होत असून या भूसंपादनास ग्रामस्थांचा विरोध आहे. अवाजवी भूसंपादन केल्याने अनेक लोक बेघर होणार आहेत. आमच्या माहितीप्रमाणे शहरी भागात २२.०५ मीटर भूसंपादन होणार आहे. पावशी गावातील दूरध्वनी बिले ही शहरी भागाप्रमाणे आकारत असल्याने पावशी गाव हा शहरी भागातच येतो. त्यामुळे पावशी गावात २२.०५ मीटर भूसंपादन करण्यात यावे. तसेच दोन्ही बाजूने समसमान भूसंपादन करण्यात यावे, अशी आमची मागणी आहे. भूसंपादन करण्यासाठी भविष्यातील ६० ते १०० वर्षांचा दळणवळणाचा विचार करून मोठ्या प्रमाणात भूसंपादन करण्यात येत असल्याने जमिनींची किंमत तसेच निवासी घरांची किंमत सुद्धा भविष्यातील ६० ते १०० वर्षानंतरची बाजारभावाच्या ४ ते ६ पटीने ग्रामस्थांना व शेतकऱ्यांना मिळावी. भंगसाळ नदीवरील पुलावर पुराच्या वेळी ५ ते ६ फूट पाणी असते. या सर्व गोष्टींचा विचार करून रहिवाशी व ग्रामस्थांवर अन्याय न होता त्यांना विश्वासात घेऊन भूसंपादन करावे. अन्यथा अनेक लोक बेघर होऊन त्यांच्या उपजीविकेचे साधन बंद होईल. ग्रामस्थांचे म्हणणे शासनाकडे मांडावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदन देताना पावशीचे सरपंच श्रीपाद तवटे यांच्यासह ग्रामस्थ मेघराज वाटवे, वृणाल कुंभार, विनायक मयेकर, संजय कोरगावकर, रवींद्र तुळसकर, संजय केसरकर, अनिल पेडणेकर, अनिल कुंभार, रमेश कुंभार, वेदेश ढवण, अशोक शिरसाट, श्रीधर मुंज, भास्कर गोसावी, योगेश तुळसकर, सुनील तवटे, चंद्रकांत पाटकर व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. (प्रतिनिधी)
ग्रामस्थांना विश्वासात घेऊन चौपदरीकरण करा
By admin | Updated: May 21, 2015 00:08 IST