वैभववाडी : वन्य प्राण्यांची शिकार करण्याच्या हेतूने फिरणाऱ्या चौघांना वैभववाडी पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई काल, शुक्रवारी रात्री एक वाजता भुईबावडा-उंबर्डे दरम्यान केली. यात पाचजणांवर गुन्हे दाखल करून त्यातील चौघांना अटक केली. तीन लाखांची सुमो गाडी मिळून एकूण तीन लाख १६ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल बंदुकीसह जप्त केला. चार आरोपींना दुपारी कणकवली न्यायालयात हजर करण्यात आले. बंदूक मालक दत्ताराम लक्ष्मण गुरव यास सायंकाळी उशिरापर्यंत अटक करण्यात आली नव्हती. काल रात्री वैभववाडी पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल नितीन कदम व पथक गस्त घालत होते. यावेळी भुईबावडा-उंबर्डे दरम्यान एमएच ४३, डी ४२५५ या सुमो गाडीतून गणपत कृष्णा गुरव (वय ४७, रा. कोकिसरे गुरववाडी), अनिल रमेश पांचाळ (४२), जयवंत सुरेश टक्के (२५), योगेश अंकुश मेस्त्री (२६, सर्व रा. शिडवणे) हे शिकारीचे साहित्य घेऊन प्रवास करीत होते. रात्री त्यांची गाडी तपासणीकरिता थांबवली असता त्यामध्ये १५ हजार रुपये किमतीची डबल बॅरेल बंदूक, १२५० रुपयांची काडतुसे, सर्च बॅटरी १०० रुपये असा मुद्देमाल आढळून आला. त्यांची सखोल चौकशी केली असता कोकिसरे गुरववाडी येथील दत्ताराम लक्ष्मण गुरव (५०) यांच्या मालकीची ही बंदूक घेऊन ते चौघे शिकारीकरिता निघाले होते. त्यानुसार पोलिसांनी त्या चौघांसह बंदूक मालकावर गुन्हा दाखल केला. यातील चौघांना अटक करून दुपारी कणकवली न्यायालयात हजर केले. सायंकाळी उशिरापर्यंत बंदूक मालकाला ताब्यात घेतले नव्हते. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण गवस करीत आहेत. (प्रतिनिधी)
वन्य प्राणी शिकारप्रकरणी चौघांना अटक
By admin | Updated: November 9, 2014 01:49 IST