मालवण : एस. टी. चालकाला मारहाण करून महिला वाहकास शिवीगाळ केल्याप्रकरणी मालवण न्यायालयाने वेंगुर्लेतील नित्यानंद उर्फ शैलेश शशिकांत पाटील (वय ३१, रा. म्हाडा कॅम्प, वेंगुर्ले), संदेश रमाकांत गावडे (वय २८, रा. अणसूरवरचे, वेंगुर्ले), रविकांत चंद्रकांत राऊळ (वय ३९, रा. राऊळवाडी, वेंगुर्ले), भगवान शशिकांत गावडे (वय ३९, रा. गावडेवाडी, वेंगुर्ले) आणि सतीश शशिकांत कुबल (वय २८, रा. रामेश्वर मंदिराजवळ, वेंगुर्ले) या पाचही जणांना गुरुवारी दोषी ठरविले. मालवणचे न्यायाधीश स. द. चव्हाण यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. यात नित्यानंद उर्फ शैलेश शशिकांत पाटील याला दहा महिने साधी कैद आणि १६ हजार ५०० रुपये दंड तर उर्वरित संदेश रमाकांत गावडे, रविकांत चंद्रकांत राऊळ, भगवान शशिकांत गावडे आणि सतीश शशिकांत कुबल या चारहीजणांना ४ महिने साधी कैद व प्रत्येकी ११ हजार ५०० रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम तत्काळ भरून घेण्यात आल्यानंतर सर्व आरोपींची जामिनावर मुक्तता करण्यात आली. सरकारी पक्षातर्फे अॅड. अमित पालव यांनी काम पाहिले. १२ जुलै २००९ रोजी काळसे रवळनाथ मंदिराजवळ मालवण ते कुडाळ अशी बस कुडाळ आगाराचे चालक विनायक मनोहर प्रभू हे महिला वाहकासमवेत घेऊन जात होते. सायंकाळी ५.५० वाजण्याच्या सुमारास वेंगुर्ले येथील पाच व्यक्तींनी पाठीमागून येवून आराम कार अपोलो अॅस्ट्रा (क्र. एम. एच. २०-८६४९) एस. टी. समोर थांबविली आणि प्रभू यांना मारहाण केली. तसेच महिला वाहकासही शिवीगाळ करून निघून गेले. या प्रकरणी मालवण स्थानकातील पोलिसांनी तत्काळ भादंवि कलम ३५३, ५०९, ३४१, ३३२, १४३, १४७, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी तपास प्रभारी पोलीस अधिकारी गजानन मातोंडकर यांनी केला होता. या प्रकरणी पाचही संशयित आरोपींना अटक करण्यात आली होती. या प्रकरणाची सुनावणी पूर्ण होऊन न्यायालयाने गुरुवारी निकाल दिला. (प्रतिनिधी)
बस चालकास मारहाण प्रकरणी पाच जण दोषी
By admin | Updated: May 16, 2014 00:18 IST